महिन्याभरापूर्वी राज्यात राजकीय वर्तुळापासून तर सामाजिक वर्तुळापर्यंत सर्वत्र सरकारच्या वाईन विक्री धोरणावर मोठा गदारोळ बघायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारने सरकारचे वाइन विक्री धोरण अर्थात एक हजार स्केअर फुट पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला द्राक्ष बागायतदारांच्या हिताचे असल्याचे सांगत सरकारच्या निर्णयाचे हात खोलून स्वागत केले तर विरोधी पक्षाने सरकारच्या या निर्णयाचा मोठा विरोध केला. सामाजिक क्षेत्रातून देखील या निर्णयाचा विरोध झाला मात्र द्राक्ष बागायतदारांनी सरकारचा हा निर्णय फायद्याचा असल्याचे सांगितले.
आता भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याने याबाबत थेट मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिले आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पदरी कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने शेती करायला परवडत नाही म्हणून ज्याप्रकारे महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी दिली अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना देखील वाईन विक्रीची परवानगी द्यावी यासंबंधीचे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांने लिहिल आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या या पत्रामुळे संपूर्ण राज्यात वाईन विक्रीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील या शेतकऱ्याने पत्रात नमूद केले की, मागील वर्षी जिल्ह्यात चक्रीवादळ आले त्यात त्यांचे तसेच त्यांच्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे त्यांच्या धान पिकाला मोठा फटका बसला होता.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाद्वारे पंचनामे देखील करण्यात आले मात्र आता एवढे दिवस उलटूनही झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी वारंवार शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी देखील केली आहे मात्र असे असले तरी शेतकऱ्यांची कैफियत शासनाने ऐकून घेतली नाही आणि अद्यापही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आलेली नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या या अडचणी कमी होत्या की काय म्हणून शासनाने गेल्या वर्षापासून धान पिकावर मिळणारा बोनस देखील बंद केला आहे. यामुळे शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे गाढवे यांनी नमूद केले.
शेतीसाठी आवश्यक उत्पादन खर्च आणि शेतीमधून प्राप्त होणारे उत्पन्न यांची सांगड बसत नसल्याने शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह भागविणे मुश्कील झाले आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी लागणारा खर्च परिवाराच्या आरोग्यावर होणारा खर्च तसेच वाढती महागाई यामुळे केवळ शेती करून शेतकऱ्यांना उदरनिर्वाह भागविणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व परिस्थितीचा विचार करत ज्या पद्धतीने शासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी दिली अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना देखील वाईन विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. गाढवे यांनी त्यांनी लिहिलेले पत्र स्पीड पोस्टद्वारे मुख्यमंत्री साहेबांकडे रवाना केले आहे. गाढवे यांच्या या गजब मागणीची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.
Share your comments