राज्यातील शेतकऱ्यांना मोठं आर्थिक संकट आले आहे, हे संकट बोगस बियाणांमुळे आलं आहे. राज्यातील विविध भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी आल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झाल्याच्या राज्यात ३० हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. दरम्यान या तक्रारींनुसार कारवाई करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
राज्यात खरीपाचा पाऊस वेळेवर आणि चांगला झाला. खरीपाची पेरणी झाल्यानंतर लगेच सोयाबीन बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांमध्ये याची प्राथमिक पाहणी केली. या पाहणीमध्ये महाबीजचे आणि काही खासगी कंपनीचे बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. महाबिजसह बावीस कंपनीच्या विरोधात राज्यांत विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. राज्यात सुमारे ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह २२ कंपनीचे बियाणे बोगस किंवा कमी दर्जाचे असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. महाबीजकडून तूर्तास कारवाई पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी बियाणे उपलब्ध करून द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार आतापर्यंत महाबीजने दहा हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना दिले आहे. परंतु हे पुन्हा दिलेले बियाणे सुध्दा उगवले नाही अशाही काही तक्रारी आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे असं सांगण्यात आले होते. प्रत्येक गावात कृषी सहायकांच्या माध्यमातून घरगुती बियाण्यांचे उत्पादन क्षमताही निश्चित करण्याचे प्रयोग राबवण्यात आले. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी घरच्याच बियाणांचा वापर केला. त्यामुळे बोगस बियाणांमुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता आला आहे. आता ज्या कंपनीकडून अशा बियाण्यांचा पुरवठा झाला त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
Share your comments