Crop Insurance :- पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी योजना असून नैसर्गिक आपत्ती काळामध्ये पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेच्या माध्यमातून केले जाते. अगोदरपेक्षा आता ही योजना शेतकऱ्यांसाठी अधिक सोपी झाली असून शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये या योजनेत सहभागी होता येते. त्यामुळे यावर्षी नक्कीच या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
जर आपण या हंगामातील आकडेवारी पाहिली तर जवळपास एक कोटी 69 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 112 लाख हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे.जर आपण पिक विमा योजनेतील नुकसान भरपाईच्या संबंधित असलेल्या तरतुदी पाहिल्या तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
त्यामुळे सध्या राज्यांमध्ये जो काही पावसाने खंड दिला आहे त्यामुळे देखील खरिपातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पावसाच्या खंड पडल्यामुळे नुकसान झाले तर पिक विमा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यांना लाभ मिळू शकतो का? हा देखील मोठा प्रश्न आहे. या संबंधीचीच माहिती या लेखात घेऊ.
पिक विमा योजनेतील महत्त्वाच्या तरतुदी
जर आपण पिक विमा योजनेचा विचार केला तर यामध्ये विमा संरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी असून त्यातील एक महत्त्वाची तरतूद म्हणजे जर हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली व त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पूरस्थिती, पावसात पडलेला खंड तसेच दुष्काळी परिस्थिती अशा मुळे जर पिकांचे नुकसान झाले व उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असेल तर नुकसान भरपाई मिळते. परंतु यामध्ये तुम्हाला अपेक्षित विमा नुकसान भरपाई जी मिळणारी असते त्यापैकी 25% मर्यादा पर्यंतची रक्कम आगाऊ स्वरूपामध्ये दिली जाते.
पिकांची जी काही वाढीची अवस्था असते त्यामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडल्या व उत्पादनामध्ये घट आली तर या बाबी समोर ठेवून आगाऊ रक्कम देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रातील पावसाचा खंड पडल्याची स्थिती
सध्या जर आपण राज्याचा विचार केला तर एकूण 2070 महसूल मंडळे असून त्यापैकी 558 मंडळांमध्ये 15 ते 21 दिवस इतका पावसाचा खंड पडला आहे. जर आपण साधारणपणे परिस्थिती पाहिली तर अशा परिस्थितीत जर 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला तर ती अवस्था पिकांसाठी धोक्याची असते. जर आपण विभागांचा विचार केला तर सध्या पुणे विभागांमधील 107, लातूर विभागातील 32, कोल्हापुर विभागातील 30, नाशिक विभागातील 25, अमरावती विभागातील 12 आणि औरंगाबाद विभागातील 25 मंडळांचा यामध्ये समावेश आहे.
याबाबत कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून एक पत्रक काढण्यात आलं असून त्यामध्ये म्हटल आहे की, राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा सलग 21 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा खंड पडला असून त्याचा विपरीत परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता असल्यामुळे सरासरी उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट येऊ शकते अशी परिस्थिती काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे अशा भागांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील सर्व जिल्हाधिकारी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना आणि विमा कंपन्यांना देखील देण्यात आले आहेत.
या परिस्थितीत कशी दिली जाते नुकसान भरपाई?
पंतप्रधान पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे जर नुकसान झाले तर अपेक्षित विमा संरक्षणाच्या 25% आगाऊ रक्कम भरपाई म्हणून मिळते. त्यासाठी पिकांचे उंबरठा उत्पादन, प्रत्यक्ष पाहणीतील अपेक्षित सरासरी उत्पादन आणि विमा संरक्षण रक्कम इत्यादी बाबींचा विचार केला जातो. ज्या भागामध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे त्याबाबत कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्याकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाते व या सर्वेक्षणातून उत्पादनामध्ये खरंच घट येऊ शकते का? याची पाहणी केली जाते.
नंतर या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ठेवला जातो. यामध्ये पिकांच्या चालू वर्षाच्या जे काही अपेक्षित उत्पादन आहे त्यामध्ये गेल्या सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत जर 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तरच विमा नुकसान भरपाईची 25% पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना आगाऊ देण्याचा निर्णय घेतला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित निर्णय घेतल्यानंतर संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जे काही सूत्र आहेत त्यानुसार ही रक्कम आगाऊ स्वरूपात वाटप केली जाते.
Share your comments