अनेकांना वाटत असते की आपण श्रीमंत व्हावे, तसेच आपल्याकडे देखील गाडी बंगला असावा. मात्र ते सर्वांच्याच नशिबात नसते. श्रीमंत होण्यासाठी तुमचा पगार खूप जास्त असला पाहिजे किंवा तुमचा व्यवसाय नेहमीच नफ्यात असायला हवा असे नाही. अगदी कमी पगारात आणि कमी नफ्यात बचत करणे हा श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. याकरिता गुंतवणूक योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केली जाणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीपासून लहान बचत करून देखील तुम्ही मोठे भांडवल उभे करू शकता. तसेच गरजेच्यावेळी हा पैसा वापरू शकता. यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतील.
गुंतवणुकीचे छोटे आणि उत्तम मार्ग अवलंबून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मासिक खर्च, वय, पगार, रिस्क प्रोफाइल आणि गुंतवणूक योजना या गोष्टी जाणून घेतल्यानंतरच गुंतवणूक करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला काय परतावा अपेक्षित आहे, याची माहिती घ्या. मराठीत एक म्हण आहे की आपले अंथरून बघून हातपाय पसरावे, म्हणजेच आपल्याजवळील पैसे बघूनच त्यांचे नियोजन करावे. तसेच अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणूकीचे पर्याय निवडा. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला ३२०० रुपयांची बचत करत असाल आणि तुम्हाला या रकमेवर १०% परतावा मिळत असेल, तर ३० वर्षांनंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळेल.
बचत केलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा. यासाठी पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या विविध बचत योजना हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. यासोबतच शेअर बाजार, म्युच्युअल फंड, पीपीएफ, विमा आणि एलआयसी या चांगले परतावा देणारे पर्याय आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा उच्च जोखीम आणि उच्च परतावा असलेला पर्याय आहे. पण शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जातात.
तसेच आपल्या पगारातील काही रक्कम ही बाजूला काढत चला, मग त्याला कधीच हात लावू नका. खूपच गरज असेल तेव्हा ही रक्कम खर्च करा. पॉवर, आयटी, ऑटो या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. बँकिंग क्षेत्रातील एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सचा बाजारातील चढ-उतार लक्षात घेतल्यास या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. सोने आणि चांदी गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे यामध्ये देखील गुंतवणूक करत चला. तुमच्या बचतीपैकी केवळ १५ ते २५% रक्कम गुंतवून तुम्ही अधिक परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंडांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीचा पर्याय असतो. यामध्ये गुंतवणूकदार पैसे थेट गुंतवण्याऐवजी फंड मॅनेजरमार्फत गुंतवणूक करतो. यामध्ये तुम्ही तुमच्या बचतीनुसार दरमहा पैसे गुंतवू शकता.
Share your comments