गेल्या काही दिवासांपासून राज्यातील काही भागात होणार पूर्वमोसमी पाऊस आता थांबला आहे. आजपासून राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर देशातील काही राज्यात पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
येत्या पुढील २४ तासात आसाम, मेघालय, अरुणाचलप्रदेश, नागालँड आणि पश्चिम बंगालमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. देशाच्या उत्तर-पुर्वेकडील भागात, केरळमधील काही भागात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात उन्हाचा चटका वाढणार आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे उन्हाचा चटका कमी होताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेडसह परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमानाचा पारा चाळीशीपुढे गेला आहे. वाशीम, वर्धा येथेही तापमान ४२ अंशांपेक्षा अधिक आहे. मागील २४ तास -उडिसा, उत्तर-पुर्वी बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्किम, पूर्वोत्तर भारत आणि केरळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला. यासह छत्तीसगड, उत्तरप्रदेशाच्या पुर्वेकडील भागात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तरी अंतरिक कर्नाटकातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
Share your comments