पूर्वी इंग्रजांच्या काळी बांधण्यात आलेल्या अनेक वास्तू आणि पाण्याचे बंधारे अप्रतिम बांधण्यात आले आहेत. सुरक्षा आणि दिर्घ आयुर्मान याचा सुरेख मेळ घालून बांधण्यात आलेल्या वास्तूंचा ठेवा आपल्याकडे ते सोडून गेले आहेत. सध्या अशी कामे होताना दिसत नाही आणि त्याची देखभाल देखील होत नाही. त्यात जगात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना पाणीसाठ्यांकडे दुर्लक्ष करणे ही अति गंभीर बाब आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आता असाच एक प्रकार समोर आला असून ढेबेवाडी विभागातील महिंद धरणाच्या देखभालीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धरणाच्या सांडव्याकडील कोसळलेली भिंत आणि धरणाच्या आतील बाजूला पडलेले भगदाड असेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या या प्रकाराविरोधात नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ढेबेवाडीपासून दहा किलोमीटरवरील महिंद गावाजवळच्या वांग नदीवर २० वर्षांपूर्वी ८५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या मातीच्या धरणाची लांबी ४८४ मीटर असून, त्याला १०४ मीटर लांबीचा मुक्तपतन पद्धतीचा सांडवा आहे. २१.३२ मीटर उंचीच्या महिंद धरणाजवळून महिंदफाटा ते बोर्गेवाडी माथनेवाडी रस्ता गेला आहे. सांडव्यापासून रस्ता उंचावर असल्याने दोन्हीच्या दरम्यान लांबपर्यंत दगडी संरक्षक भिंतीचे बांधकाम केलेले आहे. असे असताना मात्र २०२० रोजी येथील भिंतीची काहीअंशी पडझड झाली.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धरणस्थळी धाव घेऊन माहिती घेतली आणि भिंत दुरुस्तीचे अंदाजपत्रक व प्रस्ताव सादर केला. या घटनेला आता अनेक दिवस उलटले असले तरी नवीन भिंतीच्या बांधकामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. संपूर्ण दगडी भिंत कुमकुवत झाली असून ठिकठिकाणी पायथ्याचे दगड निसटले आहेत.
तुटलेल्या भागाची पुनर्बांधणी करण्यापेक्षा कमकुवत झालेली संपूर्ण भिंतच नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे. याच धरणाला भिंतीजवळ पडलेले मोठे भगदाडही अनेक दिवसांपासून जैसे थे आहे. पावसाळ्यापूर्वी माती व दगड भरून ते बुजविण्याचा प्रयत्न होतो. शिवाय यावर तज्ज्ञांमार्फत उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Share your comments