पुणे: येत्या 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत राज्य शासनाच्या वतीने ‘कुक्कूटपालन वर्ष’ साजरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती व्हायला हवा, अशी अपेक्षा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली. जागतिक अंडी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार साबळे, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण, सहआयुक्त डॉ. धनंजय परकाळे, डॉ. गीता धर्मट्टी, डॉ. प्रसन्न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे आदी उपस्थित होते.
पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर म्हणाले, पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर अंड्यामधील प्रथिनांचा क्रमांक लागतो. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांस यापेक्षा पचनास हलकी असतात आणि सर्व वयोगटातील लोकांना सहज पचतात. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातही अंड्यांची सोय करण्यात येईल. राज्यामध्ये सध्या दीड कोटी अंडी उत्पादन होते. राज्याची अंड्यांची गरज तीन कोटींची आहे, उर्वरित अंडी आंध्रप्रदेश, तेलंगाणा राज्याकडून विकत घेतली जातात. राज्यामध्येच अंडी उत्पादन वाढवण्याची मोठी संधी असून शेतकऱ्यांनी कुक्कूट पालनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. पशुसंवर्धन, कुक्कूटपालन या व्यवसायामध्ये हे उत्पन्न चारपट करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले. कुक्कूटपालन, सेंद्रीय खाद्य निर्मिती, विक्री व्यवस्थापन याचे नियोजन केल्यास अंडी विक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली असल्याचे सांगितले. अरब देशांचे इंडो-अरब फोरम लवकरच स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून 28 देशांमध्ये अंड्यांची जास्तीतजास्त विक्री होऊ शकते, असेही ते म्हणाले.
Share your comments