सध्याच्या जगात माणसासाठी पैसाच सर्वस्व झाला आहे. अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला पैसा आवश्यक वाटू लागल्याने माणसे पैसा अधिक मिळवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. अशाच दुप्पट पैशाच्या आमिषाने नवी मुंबई परिसरात एक व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २० लाख रुपयांच्या बदल्यात खोट्या नोटा देऊन या व्यापाऱ्याला गंडा घालण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. नवी मुंबईत व्यापाऱ्यांना गंडा घालण्याची मालिकाच सुरु आहे.
यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक व्यापाऱ्यांना गंडा घालण्यात आला होता. मात्र आता पुण्यातील व्यापाऱ्याला नवी मुंबईत बोलावून गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे दुप्पट पैशाच्या आमिषाने आलेल्या व्यापाऱ्याला या प्रकाराला बळी पडावे लागले आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर भागात राहणारे सीताराम शिंदे यांचा स्टेशनरीचा व्यवसाय आहे.
त्यांचे नातेवाईक गणेश लांडे मुंबईत राहण्यास असून गेल्या काही दिवसांपूर्वी या टोळीने नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने गणेश याच्याशी संपर्क साधला होता. त्याला लाखो रुपये दुप्पट करून मिळतील, असे प्रलोभन या भामट्यांनी दाखवले होते. परंतू त्याच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे त्याने शिंदे यांना या प्रकारे पैसे दुप्पट करून मिळत असल्याचे सांगितले. मात्र प्राथमिक या प्रकारावर शिंदे यांचा विश्वास बसला नाही. परंतू ही बाब तपासून पाहण्यासाठी त्यांना नवी मुंबईतील वाशी येथे येऊन खात्री करण्यास सांगण्यात आले.
यावर मागील महिन्यात त्यांना ५ हजारांच्या बदल्यात १० हजार रुपये देण्यात आले होते. हे पैसे दुप्पट झाल्याने शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईक, मित्र आणि स्वतःचे दागिने गहाण ठेऊन २० लाख रुपये जमा केले. तसेच संबंधित व्यक्तीची भेट घेऊन २० लाख रुपये दिले. यावर ते पैसे घेऊन ४० लाख रुपये आणून देतो सांगत या भामट्यांनी पळ काढला. यावर शिंदे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Share your comments