परभणी कृषि विद्यापीठाने आदिवासी उपप्रकल्पांतर्गत आदिवासी बहुल मौजे वाई गाव दत्तक घेऊन गेल्या पाच वर्षापासुन कृषि तंत्रज्ञान विस्ताराचे कार्य करीत आहे, आज या गावातील शेती व शेतकऱ्यांच्या जीवनाचा कायापालट झाला असुन गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादन व उत्पन्नात भरिव अशी वाढ झाली. विशेषत: पाणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञानाच्या आधारे सोयाबीन, गहु, हरभरा, हळद, ऊस आदी पिकांच्या उत्पादनात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला आहे, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पातंर्गत पाणी व्यवस्थापन योजनेमार्फत आदिवासी उपप्रकल्पाच्या वतीने हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील वाई गावात दिनांक 26 जानेवारी रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, सरपंच शकुराव मुकाडे, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे, संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, शास्त्रज्ञ डॉ. गजानन गडादे, श्री. राम कडाळे, श्री. कैलास कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्हणाले की, प्रकल्पापुर्वी गावातील शेतकरी केवळ खरिप हंगामातच पिक लागवड करीत होते तसेच इतर वेळी गावातील वृध्द सोडता शेतकरी व युवक मोठया प्रमाणात ऊसतोडीकरिता स्थलांतर करत होते. पंरतु प्रकल्पातंर्गत गावातील आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक ठिंबक व तुषार सिचंन संचाचे वाटप करण्यात आले व त्याचा शेतकरी बांधवानी कार्यक्षमरित्या वापर केला.
आज अनेक आदिवासी शेतकरी हळद व ऊस या नगदी पिकांकडे वळाले असुन गाव रोजगाराची वाढ झाली, गावांतुन होणारे ऊसतोडीसाठीचे स्थलांतर पुर्णपणे थांबले आहे. ऐवढेच नव्हे तर गावातील शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलला आहे. गावातील कच्च्या घरांची जागी पक्क्या घरांनी घेतली असुन गावातील मुलामुलींचा शिक्षणातही प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. ऐवढयावरच कृषि विद्यापीठ थांबणार नसुन गावातच शेतीपुरक जोडधंदे व शेतमाल प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर मौजे वाई गांवात परभणी कृषि विद्यापीठाने गेल्या पाच वर्षात राबविलेल्या कृषि तंत्रज्ञान विस्तार कार्यामुळे गावात मोठा बदल झाला असुन कृषि तंत्रज्ञानाची गंगाच गावात अवतरली असे म्हणाले.
सरपंच श्री. शकुराव मुकाडे आपल्या मनोगतात म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्या प्रयत्नामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे जीवन समृध्दीकडे वाटचाल करित असून विद्यापीठ शास्त्रज्ञ व आदिवासी शेतकरी यांचे नात दृढ झाले आहे. तर मनोगतात माजी सरपंच श्री. नामदेव लाखाडे म्हणाले की, विद्यापीठाने वाटप केलेल्या तुषार व ठिबक सिचंन संचामुळे व पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे गावातील 180 हेक्टर बागायती जमिनीत वाढ होऊन 478 हेक्टर जमिन बागायती झाली, विशेषत: ही जमीन खडकाळ व मुरमाड आहे.
मेळव्यात तीन तुषार सिंचन संचाचे तर 16 आदीवासी शेतकऱ्यांना ठिबकच्या उपनळयाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शिवार फेरीच्या माध्यमातुन दत्तक शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यात येत असलेल्या विविध पिक प्रात्यक्षिके व उपक्रमास कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. अशोक कडाळे यांनी आदिवासी उपप्रकल्पांतर्गत मौजे वाई गावांत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रकाश पतंगे यांनी केले तर आभार डॉ. गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. के. आर. कांबळे, डॉ. स्मिता सोंळकी, डॉ. लक्ष्मणराव जावळे, डॉ. अनुराधा लाड आदीसह गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुकमार गिराम, प्रभाकर सावंत, देवेंद्र कुऱ्हा, अंजली इंगळे, प्रकाश मोते, कृषी पर्यवेक्षक नंदु वाईकर, कृषि सहाय्यक माधव मोटे आदीसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share your comments