राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर २९ रुपये दूध दर देण्याचा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून केली जाणार आहे. विक्री दरात वाढ केली जाणार नसल्याचे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. दूध संघाच्या सदस्यांची शनिवारी पुण्यात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात बैठक झाली. राज्यभरातील सुमारे ४० दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.लॉकडाऊनमुळे मागील सुमारे वर्षभरापासून या संघाची एकही बैठक घेता आली नव्हती. त्यामुळे सुमारे वर्षभराच्या खंडानंतर आज पहिलीच बैठक घेण्यात आली.
कोरोनामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघही अडचणीत आले आहेत. कारण कोरोना मुळे मध्यंतरी दूध खरेदी दरात मोठी कपात झाली होती. शिवाय पाऊच पॅकिंगमधील दूध विक्रीत पूर्वीच्या तुलनेत ३५ ट्क्क्यांने घट झाली आहे. या घटीमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. पंरतु सध्या दूध पावडर आणि लोणी दरात वाढ झाली आहे. यामुळे दूध खरेदी दरात वाढ केल्याचे कुतवळ यांनी स्पष्ट केले.
Share your comments