कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विदर्भातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात कापसाला सोन्यासारखा भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विदर्भातील शेतकरी खरिपात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात.
विदर्भाचे कापूस (cotton crop) हे एक मुख्य पीक आहे. विदर्भातील बहुतांशी शेतकऱ्याचे सर्व अर्थकारण हे केवळ कापूस पिकावर अवलंबून आहे. यावर्षी कापसाला ऐतिहासिक बाजार भाव (cotton rate) मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सुखावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यंदा कापसाच्या ऐतिहासिक बाजारभावाने गेल्या पन्नास वर्षातील रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
हेही वाचा:-काय सांगता! कापसाच्या या जाती देतात बम्पर उत्पादन; बोंड आळीचा देखील होतं नाही विपरीत परिणाम, वाचा
खरीपात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात (cotton production) मोठी घट झाली, मात्र असे असताना देखील हंगामाच्या सुरुवातीला कापसाला केवळ सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत होता. परंतु, जसजसा हंगाम पुढे सरकत राहिला तसतसा कापसाला विक्रमी भाव मिळत राहिला. जानेवारी महिन्यात कापसाला तब्बल दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला.
कापसाची मागणी अजूनदेखील कायम आहे म्हणून सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला या हंगामातील सर्वोच्च दर मिळाला आहे. या एपीएमसीमध्ये कापसाला तब्बल 13 हजार 400 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. यामुळे सदर शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या बाजारपेठेत कापसाला विक्रमी भाव मिळत असला तरी देखील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला कापूस विक्री केला असल्याने फारच कमी शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. सिंधी एपीएमसीमध्ये केवळ एका आठवड्यात कापसाच्या दरात तब्बल पावणे तीन हजारांची वाढ नमूद करण्यात आली आहे.
आठवड्याभरापूर्वी दहा हजारांच्या आसपास स्थिरवलेला कापसाचा बाजार भाव एका आठवड्यात 14 हजारांच्या घरात गेल्याने कापूस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. एकंदरीत या दरवाढीचा थोड्या शेतकऱ्यांना का होईना पण फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:-कापसाच्या दरात वाढ! पुन्हा शेतकऱ्यांनी फरदड कापुस उत्पादनाकडे वळवला मोर्चा; पण…..!
Share your comments