केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा देशासह महाराष्ट्रात 23 सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या योजनेमुळे राज्यातील 83.72 लाख कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. रविवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83.72 लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे.
राज्यात सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून त्याचा लाभ 2 कोटी 23 लाख कुटुंबाना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असून प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यातील 484 शासकीय व खासगी रुग्णालयांमार्फत ही सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया योजनेंतर्गत करण्यात आल्या आहेत.
राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार आहे. 23 सप्टेंबर 2018 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप केले जाणार आहे.
Share your comments