निफाड- उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे द्राक्षपंढरीचा पारा कमालीचा कोसळला आहे. त्यामुळे द्राक्षांना तडे गेल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आले आहेत. दरम्यान निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून शनिवारी कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर पारा ६.५ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे.
. निफाड तालुक्यात मागील पंधरावाड्यात अवकाळी पावसानंतर हवामान बदलत होते. तापमानात घट होऊन थंडीत वाढ झाली. यंदाच्या द्राक्ष हंगामात पारा ६.५ अंशांवर आल्याने द्राक्षाला फटका बसणार आहे. सध्या द्राक्षमणी विकसीत होऊन त्यांची फुगवण होण्याचा काळ आहे. मात्र थंडीच वाढ झाल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबली आहे. द्राक्षबागा कडाक्याच्या थंडीत सुप्तावस्थेत जातात.
परिणामी द्राक्ष घडांचा विकास थांबतो व द्राक्षमालाच्या प्रतवारीस अडथळा निर्माण होतो, यावर द्राक्षबागेत शेकटी करणे, पहाटेच्या वेळी ठिबक सिंचन अथवा संपूर्ण बागेला पाणी देणे अशा उपाययोजना कराव्या लागत आहेत. बहुतांश भागात पहाटे पाणी देण्यासाठी भारनियनाचा अडथळा ठरतोय. त्यामुळे द्राक्षबागायतदार कोंडीत सापडला आहे.
तापमान घसरत असल्याने परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका द्राक्ष बागायतदारांच्या मानगुटीवर आहे. द्राक्षघडावर सनबर्निगस धोका वाढला आहे. दुसरीकडे तापमानातील घसरण कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसाठी मात्र पोषक ठरत आहे.
Share your comments