मराठवाड्यातून एका लग्नाची अनोखी कथा समोर येत आहे, मराठवाड्यात एका हौशी नवरदेवाने आपल्या नवरीला नेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच बुक केले, यामुळे संपूर्ण मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीन टप्पे अति महत्त्वाचे असतात, ते तीन टप्पे म्हणजे शिक्षण, करियर आणि लग्न. विवाहाच क्षण हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो, हा अविस्मरणीय क्षण कायम आठवणीत राहावा त्यामुळे अनेक लोक लाखोंचा खर्च करत असतात. मराठवाड्यातील अंबड शहरात देखील एका नवयुवकाने आपला विवाह अविस्मरणीय बनावा या हेतूने एक नामी शक्कल लढवली, आणि आपली नववधू चक्क हेलिकॉप्टरनेच घरी आणण्याचे ठरवले.
25 फेब्रुवारी रोजी झालेल्या विवाहात अंबडच्या नवरदेवाने औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे करमाड येथील रहिवाशी नवरीस भाड्याच्या हेलिकॉप्टरने आपल्या घरी नेले. अंबड शहरातील व्यापारी तसेच युवा सेना तालुका प्रमुख राम लांडे यांचे लग्न मराठवाड्यातीलच औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाडच्या चित्रा या तरुणीशी ठरले. राम आणि चित्रा यांचा विवाह 25 फेब्रुवारी रोजी गोरस मुहूर्तावर करण्याचे योजिले गेले. हा विवाह एका आगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे मोठा गाजत आहे, त्याचं झालं असं राम अनेक विवाह सोहळ्यात उपस्थित राहिले आहेत, आणि त्यांनी प्रत्येक विवाहात वेगवेगळे इव्हेंट प्रत्यक्ष बघितले आहेत. त्यामुळे राम यांना त्यांचा विवाह त्यापेक्षा वेगळा आणि थोडा हटके अशा पद्धतीचा संपन्न करायचा होता, त्या अनुषंगाने राम यांच्या मनात त्यांच्या पत्नीला हेलिकॉप्टरमधून घरी घेऊन जायचे असा विचार आला आणि त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या विवाहाच्या दिवशी त्यांच्या या विचारास मूर्त रूप देऊन टाकले.
25 फेब्रुवारी जेव्हा, राम आपल्या विवाहासाठी करमाड कडे रवाना होत होते तेव्हा अंबड येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर लहान पोरांची मोठी गर्दी बघायला मिळाली, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वजण नवरदेवाला घेऊन जात असलेल्या हेलिकॉप्टरला बघण्यासाठी गर्दी करत होते. अशीच काहीशी परिस्थिती नवरदेव ज्यावेळी विवाहस्थळी पोहोचला तेव्हा देखील बघायला मिळाली. हे दृश्य बघून वधू देखील भारावून गेल्याचे बघायला मिळाले तसेच वधू पक्षाकडील सर्वांचा आनंद हा द्विगुणित झाला होता. आपली मुलगी जावयासोबत हेलिकॉप्टरने घरी जाणार या आनंदामुळे मुलगी सासरी नांदायला जाणार हे दुःख नवरीच्या आई-वडिलांचे थोडेसे कमी झाले.
एकंदरीत अंबडच्या राम यांनी करमाळ्याच्या चित्रा यांना तसेच त्यांच्या परिवारास एक मोठा सुखद आश्चर्याचा धक्का दिला. या विवाहास अंबड तसेच करमाडच्या प्रतिष्ठित लोकांनी हजेरी लावली होती; यामध्ये सामाजिक क्षेत्रातील, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील गणमान्य मंडळी आली असल्याचे सांगितले गेले होते.
Share your comments