शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील

Wednesday, 16 January 2019 07:49 AM


अहमदनगर:
देशाची अर्थव्‍यवस्‍था शेती व शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्‍यामुळे विविध योजनांच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगतानाच टंचाई स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले. कृषी पुरस्‍कार प्राप्‍त शेतकऱ्यांचे कार्य इतर शेतकऱ्यांना नक्‍कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

अहमदनगर जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपाल पुरस्‍काराचे वितरण आज झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्‍यक्षा राजश्री घुले, आमदार बाळासाहेब थोरात, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. शेतकऱ्यांनी संशोधन स्‍वीकारल्‍यामुळे आपण अन्‍नधान्य उत्‍पादनात स्‍वंयपूर्ण झालो. संशोधन आणि शेतकरी यांची सांगड महत्त्वाची ठरली आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्‍पादनात वाढ करुन उत्‍पन्‍न वाढले. यातूनच कौटूंबिक अर्थव्‍यवस्‍था सुधारली आहे. त्‍यामुळे आज सन्‍मान झालेल्‍या शेतकऱ्यांच्‍या यशोगाथा इतर शेतकऱ्यांना नक्‍कीच प्रेरणा देणाऱ्या ठरतील.

अहमदनगर जिल्‍हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्‍याचे सांगून पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, जिल्‍हा परिषदेचे कृषी पुरस्‍कार प्राप्‍त शेतकऱ्यांना शेती अभ्‍यास दौऱ्यावर पाठविण्‍यासाठी आवश्‍यक कार्यवाही व आवश्‍यक निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. अकोले तालुक्‍यातील राहीबाई पोपेरे यांनी पारंपारीक बियाणाचे संवर्धन केले आहे. राहीबाईंनी बियाणे संवर्धनाचे काम नक्‍कीच कौतुकास्‍पद आहे. यातून सेंद्रिय शेतीकडे त्‍यांचा कल दिसून येतो व सद्य:स्थितीत सेंद्रिय शेतीची गरज असल्‍याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सांगितले.

विरोधीपक्ष नेते श्री. विखे-पाटील म्‍हणाले, शेतकरी खरा संशोधक आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून या कार्यक्रमात शेतीत नाविन्‍यपूर्ण प्रयोग करणाऱ्यां शेतकऱ्यांचा सन्‍मान होतोय ही आनंदाची बाब आहे. दुष्‍काळी स्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्‍यासाठी काम करुया, असे सांगून पुरस्‍कार प्राप्‍त शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांनी पुरस्‍कार मिळालेल्‍या शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते. त्‍यामुळे या पुरस्‍कार समारंभाचे आयोजन करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आमदार श्री. थोरात म्‍हणाले शेतकरी महत्त्वाचे संशोधन करतो. शेतकऱ्यांचे हे संशोधन सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत असल्‍याचे सांगून राहीबाई पोपेरे यांच्‍या कार्याचे कौतुक केले. जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. माने म्‍हणाले, शेतकरी एक स्‍वतंत्र कृषी विद्यापीठ आहे. शिक्षण, संशोधन आणि विस्‍ताराचे कार्य शेतकरी करत आहे. सभापती अजय फटांगरे यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील प्रगतशील शेतकरी त्‍यांचे कुटुंबीय मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

राम शिंदे ram shinde राहीबाई पोपेरे Rahibi Soma Popere आदर्श गोपाल aadarsh gopal

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.