एमपीएससीतुन अधिकारी बनणे काही सोपे काम नाही. यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील, अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करत आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलं-मुली देखील एमपीएससी (MPSC) सारख्या खडतर प्रवासात बाजी मारत आहेत.
एमपीएससी मध्ये शेतकरी पोरांची झेप आता दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त शेतकरी मुलगाच एमपीएससी सारखा खडतर प्रवास सर करू शकतो असे नाही तर मुली देखील एमपीएससीची परीक्षा पास होऊ शकतात याचेच एक उदाहरण समोर आले आहे ते नाशिक जिल्ह्यातून.
चांदोरी गावातील (Chandori) एका सामान्य शेतकरी कुटुंबात (Farmer Family) जन्माला आलेल्या प्रियंका घोरपडे यांनी एमपीएससी मध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली प्रियंका अगदी लहानपणापासून हुशार होती. प्रियांकाने आपले सुरुवातीचे शिक्षण कन्या विद्या मंदिर येथे घेतले. माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेत घेतले आणि नंतर के के वाघ मधून इंजीनियरिंगची (Engineering) डिग्री हातात घेतली.
इंजिनिअरिंग केल्यानंतर प्रियंकाने अधिकारी व्हायचं असे मनोमनी ठरवून घेतले आणि त्या अनुषंगाने जोरावर कष्ट सुरू केले. प्रियंकाने सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीई डिग्री कम्प्लीट केली. घरची परिस्थिती जेमतेम असतांना देखील तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी तिला नेहमीच प्रोत्साहित केले. आपल्या परिवाराच्या पाठवबळाच्या जोरावरच तिने 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामध्ये चांगली कामगिरी करत यश संपादन केले. या परीक्षेमार्फत तिची सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर निवड झाली.
प्रियंकाने शिक्षण घेताना अनेक चढ-उतार अनुभवले आणि यातूनच तिला एमपीएससी सारखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रेरणा मिळाली. अखेर तिने एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत यश मिळवून आपल्या परिवाराची व कामाची मान उंचावली प्रियांकाने समाजाची सेवा करण्याचा प्रण यावेळी घेतला.
Share your comments