1. बातम्या

कुटुंब गरज आधारित शेतीच्या मॉडेलमुळे शेती वाटेल मोलाची ; वाचा शेतीची नवी पद्धत

संकटाशी दोन हात करत यशाला गवसणी कशी घालावी, याचं प्रशिक्षण हवे असेल तर सोलापूरमधील मनीषा भांगे यांची प्रेरक कथा तुम्हाला वाचावीच लागेल. आतापर्यंत अनेक माध्यमांनी मनीषा भांगे यांच्या कुटुंब गरज आधारित शेतीच्या मॉडेलचे अनेक वार्तांकन केले आहे. आपले पतीचे निधन झाल्यानंतर मनीषा भांगे यांनी शेतीची जबाबदारी यशस्वी पार पाडत एक वेगळ्या शेतीची ओळख अख्या समाजाला करुन दिली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
कुटुंब गरज आधारित  शेती (मनीषा भांगे )

कुटुंब गरज आधारित शेती (मनीषा भांगे )

संकटाशी दोन हात करत यशाला गवसणी कशी घालावी, याचं प्रशिक्षण हवे असेल तर सोलापूरमधील मनीषा भांगे यांची प्रेरक कथा तुम्हाला वाचावीच लागेल.  आतापर्यंत अनेक माध्यमांनी मनीषा भांगे यांच्या कुटुंब गरज आधारित शेतीच्या मॉडेलचे अनेक वार्तांकन केले आहे. आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर मनीषा भांगे यांनी शेतीची जबाबदारी यशस्वी पार पाडत एक वेगळ्या शेतीची ओळख अख्या समाजाला करुन दिली. 

 बऱ्याच वेळा आपण कर्जबाजारीपणाला कंटाळून घरातील कर्ता पुरुष मराणाला मिट्टी मारतात. पण जर इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर त्याला कोणतीच संकटे मोठी वाटत नाहीत. मनिषा भांगे यांनीही खैरेवाडी येथील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करायची याचं उत्तम उदाहरण समोर ठेवले. माळरानाची तीन एकर जमीन, पाण्याची कमतरता असतानाही त्यांनी सेंद्रिय शेतीत मोठं यश मिळवलं आहे. त्यांच्या या कामाची दखल राज्यातून, देशातून विविध संस्था घेत असून  हे मॉडेल पाहण्यासाठी येत असतात. कृषी जागरण मराठीने आपल्या महिला विशेष अंकासाठी त्यांचा मुलगा गुरु भांगे यांच्याशी खास बातचीत केली आहे. या बातचीतमध्ये गुरु यांनी मनीषा भांगे यांच्या कामाचा ऊहापोह केला. हा ऊहापोह आम्ही या अंकात प्रसारित केला आहे. शेतीतील आईच्या कामाविषयी बोलताना गोरक्षनाथ भांगे यांची छाती अभिमानाने फुलते. 

 १९८० मध्ये रोजीरोटीसाठी मनीषाताई आणि त्याचे पती भागवत यांनी आपला एक मुलगा आणि मुलीसह गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी  पुणे गाठले. येथे आपल्या पतीला मदत, व्हावी म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पण शहरात पोट भरणे कठीण झाल्याने त्यांनी पुन्हा गावाचा कडचा रस्ता पकडला. काही काळानंतर त्यांच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर मनीषाताई भांगे यांच्यावर घराची आणि शेतीची जबाबदारी आली. आलेल्या संकटाला न घाबरता त्यांनी शेतीची नवीन मॉडेल सर्वांसमोर मांडले. पतीच्या निधनानंतर मनीषा भांगे यांनी कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलगा गोरक्षनाथला बीएस्सी, एमएसडबल्यूपर्यंत शिकवले. गोरक्षनाथ भांगे हे महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानामध्ये जिल्हा कृती संगम समन्वयक म्हणून कार्यकरत आहेत. मनीषा भांगे यांनी आपल्याकडे असलेल्या तीन एकरात ७५ पिके घेत एक वेगळ्या प्रकारची शेती तयार केली. एक कुटुंबाला आवश्यक असलेल्या अन्नघटकांचा पुरवठा आपल्याच शेतातून व्हावा, या उद्देशातून एक कुटुंब गरज आधारित शेती मॉडेल समोर आणले.

सध्याच्या शेतकऱ्यांना चट मंगणी पट ब्याह हवा. यामुळे शेतकरी पटकन उत्पादित होणारी पिके घेतात. यासाठी शेतात रासायनिक खते, औषधांचा वापर अधिक प्रमाणात करत आहेत. यामुळे पैशाची पुर्तता लवकर होते, पण शेतकरी पौष्टिक आहारापासून दूर होत आहे. सुरुवातीला उत्पन्न जरी अधिक दिसत असले तरी काही वर्षानंतर जमिनीची पोत खराब होते. यामुळे सेंद्रिय शेती ही फायद्याची असते हे मनीषाताई यांनी पटवून दिले आहे.

सेंद्रिय शेती आहे महत्त्वाची

गेल्या ९ ते १० वर्षापासून मनीषा भांगे आणि त्यांचा मुलगा गोरक्षनाथ भांगे हे सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीतून काही उत्पन्न मिळत नाही, ही अंधश्रद्धा भांगे कुटुंबाने मोडून काढली आहे. विशेष म्हणजे भांगे कुटुंबाने स्वत: काही बियाणे तयार केली आहेत. त्यांनी आपल्या घरी सीड बँक तयार केली असून त्यात ७० प्रकराच्या पालेभाज्याचे बीज निर्माण केले आहे. यामुळे बियांवरील खर्च कमी होत असतो. मनीषा भांगे यांनी तयार केलेले शेवग्याचे बीज १० हजार कुटुंबांना दिले आहेत. शेतीमध्ये गांडूळ खत तयार करण्याचे युनिट आहे. त्यातून दरवर्षी २ टन गांडूळ खत तयार केले जाते. पिकांना जीवामृत वापरल्यामुळे खते आणि कीटकनाशके यांचीही गरज कमी झाली आहे. यासह त्यांनी आपल्या शेतात फळशेतीला प्राधान्य दिले आहे. यासह त्यांनी काही औषधी वनस्पतींचीही लागवड केली आहे.

दरम्यान कोरोनामुळे सध्या लोक सेंद्रिय शेतीकडे अधिक वळालेले दिसत आहेत. यामुळे नेहमी विविध जिल्ह्यातील लोक शेतीचे मॉडेल पाहण्यास येत असल्याचे गोरक्षनाथ भांगे सांगतात. मनीषा भांगे यांच्या कामाची दखल विविध संस्थांनी घेतली असून त्यांना पुरस्करही प्रदान केली आहेत.  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमार्फत कृषी भूषण पुरस्कार  मिळालेला आहे. दिंडोरी स्वामी समर्थ प्रतिष्ठान मार्फतही पुरस्कार मिळालेला आहे. नाशिक येथील अंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाकडूनही मनीषा भांगे यांचा सन्मान केला आहे. जवळ – जवळ ९ ते १० संस्थाकडून मनीषा भांगे यांचा सन्मान झाल्याचे भांगे म्हणाले.

शेती का परडवत नाही

 शेती का परवडत नाही असा प्रश्न गोरक्षनाथ भांगे यांना केल्यानंतर ते  म्हणतात की, शेतकरी हा मार्केटमागे धावत आहे, त्यामुळे त्याला अनेकवेळा नुकसान होते. शेतीकडे आपण पेशा म्हणून पाहत नसल्याने आपले नुकसान होत आहे. आपण मार्केटवर अवलंबून राहत आपले धोके वाढत असतात. अनेक शेतकरी बाजारातून भाजीपाला, डाळी, फळे आणत असतात. यामुळे शेतकरी बाजारावर अवलंबून असल्याने दलालांच्या साखळीत अडकत असतो. त्यात दलाल नफा कमावत असतात. अधिक उत्पन्न काढायचे असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक घटकांचा वापर  करत असतो. यामुळे खर्च अधिक होत असतो.  यासह शेतीत विविध ट्रेड येत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. युटयुब, माध्यमांवरील अनेक यशस्वी कथांना शेतकरी बळी पडत असल्याचे गोरक्षनाथ भांगे सांगतात.

शेतकऱ्यांना आधी स्वता:साठी आहार पिकावला पाहिजे. आहाराच्या दृष्टीकोनातून शेतात पीक पिकवावे, ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा नक्कीच होईल. जर आपण पोषक भाजीपाला पिकवला तर आपल्या आहारात विषयुक्त अन्न येणार नाहीत. रासायनिक औषधे वापरुन पिकवलेला भाजीपाला शरिरात गेल्यानंतर परत आपल्याला विविध आजार होत असतात. यामुळे अतिरिक्त दवाखान्याचा खर्च वाढत असतो. यामुळेही शेती परडवत नसल्याचे गोरक्षनाथ भांगे सांगतात. देशात काय विकेल हे सांगणारे यंत्रणा नाही, पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे आधी सुधारणा केली गेली पाहिजे, असे गोरक्षनाथ भांगे म्हणाले. आपण भाजीपाला पिकावला तर निश्चितच आपल्याला १० ते १५ हजार रुपयांचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. नरेगा सारख्या योजनांमध्ये तीन गुंठ्यांमध्ये विविध फळझाडांची लागवड, भाजीपाला लागवड करण्यास सांगितले तर शेतकऱ्यांचा वरचा खर्च नक्कीच कमी होईल.

 

बाजारावर अवलंबून असणे, माध्यमांच्या यशस्वी कथां, रासायनिक खते आणि औषधांमुळे खर्च अधिक होत असतो. यामुळे शेती परवडत नाही. - गुरु भांगे

मिश्र पीक शेती गरजेची

आज शेतकरी एक पीक पद्धतीने शेती करत आहेत. गावातील शेतकरी जे पिके घेत आहेत, तेच पीक आपल्या शेतात घेण्याचा हट्टहास त्यांना घातक ठरत असल्याचे मनीषा भांगे सांगतात. मनीषाताई यांनी आपल्या शेतात विविध पिके एकत्र घेतली आहेत.  

कुटुंब गरज आधारित शेती मॉडेलची सुरुवात

भांगे यांचे कुटुंब हे शेतात वास्तव्यास आहे. यामुळे जे काही पोटासाठी आवश्यक आहे, त्याची उपलब्धता करण्याच्या हेतूने पिकांची लागवड केली. त्यानंतर एका नंतर एक आवश्यक पिके आणि झाडे शेतात डोलू लागली. सर्व फळझाडे, कडधान्ये, भाजीपाला शेतात उपलब्ध होत राहिल्यानंतर गरज आधारित शेती मॉडेल समोर आले. भांगे यांनी केलेल्या शेतीचे महत्त्व समजल्यानंतर अनेक माध्यमांनी याची दखल घेतली. गोरक्षनाथ भांगे म्हणतात की, ‘आम्ही एकादाही असा विचार केला नव्हता की, आपल्या शेतीची चर्चा इतक्या प्रमाणात होईल. किंवा आपल्या शेतीचे मॉडेल तयार होईल’.

 

मनीषा भांगे यांनी मजुरी करत तीन एकरात जंगल प्रकराची शेती फुलवली आहे. आता त्यांच्या शेतामध्ये ११५ प्रकारची झाडे आहेत. रासायनिक शेती करायची नाही, अशीच आधीपासून त्यांची इच्छा होती. सुरुवातीला त्यांनी रासायनिक प्रकारे शेती केली पण जमिनीचा पोत खराब होत असल्याचे कळताच त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला. त्याविषयी बोलताना गोरक्षनाथ भांगे म्हणतात, ‘आपल्या गरजा ओळखून त्या पुर्ण करता येतील अशाप्रकारची शेती करण्याचे ठरवले. मग घरापुर्ती डाळी इतर अन्नधान्य उत्पादित केले. या मॉडेलमध्ये पाच प्रकारची पीक पद्धती विकसीत  केली आहे. फळझाडे लागवड यात तीन गुंठ्यात पाच ओळी मध्ये चार फळझाडे लावण्यात आली आहेत. तसेच काही औषधी वनस्पती, भाजीपाला, वनझाडेही लावली आहेत.

भविष्यासाठी उपयुक्त आहे बांधावरील शेती

व्यापारी शेतीऐवजी भांगे कुटुंब गरजेला लागणारी पिके घेतात. पण आपल्या पुढील पिढीसाठी काय, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. पण त्यावर पर्याय म्हणून  मनीषा भांगे यांनी शेताच्या बांधावर सागवानाची झाडे, शेवग्याच्या झाडांची लागवड केली आहे. या झाडांपासून पुढील २० ते २५ वर्षात शाश्वत उत्पन्न मिळेल. जेणेकरून पुढील पिढीला म्हणजे आपल्या नातवडांना त्यांच्या आयुष्यात काही व्यवसाय करायचा असेल किंवा इतर कशासाठी पैसा हवा असेल त्यातून भांडवल उभा करू शकतील. भांगे यांनी आपल्या शेताच्या बांधावर साधरण २७० पेक्षा जास्त सागवानाची झाडे लावली आहेत, याशिवाय ६८ शेवग्याची झाडे, आणि १५०० गुंजाचे वेल लावली आहेत. पण  इतर शेतकरी मात्र बांधावरुन भांडण करण्यात धन्यता मानतात. 

 

भांगे यांनी शेती ही पारंपारिक न करता वन शेतीला प्राधान्य दिले. यातून अधिक उत्पन्न मिळत असल्याचे ते म्हणतात. यासाठी झाडाची शास्त्र समजणे आवश्यक आहे. झाडे एकमेकांना धरून वाढत असतात. जमिनीवरती झाडे सुर्यप्रकाशासाठी चढाओढ करत असतात आणि जमिनीखाली झाडे एकमेंकांना पुरक असतात ,असे गोरक्षनाथ भांगे सांगतात. जंगलात झाडांची वाढ जशी चांगली  होत असते त्याचप्रमाणे आपल्या शेतात झाडांची वाढ होत असल्याचे गोरक्षनाथ सांगतात.

English Summary: The family-based farming model makes farming worthwhile; Read the new method of farming Published on: 18 March 2021, 01:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters