मुंबई: राज्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी राज्यात अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यामध्ये चॉकी कीटक संगोपन केंद्र मोठ्या प्रमाणावर उभारणी करुन ती यशस्वीरित्या कार्यान्वीत करणे अत्यंत आवश्यक आहे. चॉकी कीटक संगोपन केंद्र स्थापन करुन केंद्रीय रेशीम मंडळाच्या निकषाप्रमाणे शास्त्रशुद्ध पध्दतीने किटक संगोपन करणाऱ्या केंद्रास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात जालना व हिरज, सोलापूर येथे आधुनिक पद्धतीने रेशीम कोषाची बाजारपेठ उभारण्यात येत आहे. अंडीपुंज निर्मिती उभारण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यामध्ये सद्यस्थितीत एकूण अंडीपुंज पुरवठयांच्या 20 ते 25 टक्के पुरवठा होत आहे. त्याऐवजी 100 टक्के चॉकी वाटपाचे लक्ष निर्धारित करावे. कर्नाटक राज्याप्रमाणे शेतकऱ्यांना अंडीपुंज न देता चॉकीचा पुरवठा कसा करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे. अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारण्यासंदर्भात विभागाने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या.
शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित व्हावा आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी कोष उत्पादन व त्याआधारे प्रक्रिया उद्योगाची साखळी उभारण्यात येणार आहे. असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्रालयात वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज, शेतकरी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Share your comments