या हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे. खरिपात आलेल्या अवेळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसावर देखील मोठ्या प्रमाणात बोंड आळीचे सावट बघायला मिळाले होते. यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती उत्पादनात घट झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वधारल्यामुळे याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत झाला आणि कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला.
सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांजवळचा कापूस पूर्णतः विक्री झाला असून आता शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक राहिलेला नाही. आणि त्यामुळेकापसाचे दर दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे सध्या राज्यात आणि कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे फरदड उत्पादन घेण्यास पसंती दर्शवीत आहेत. राज्यात फरदड कापसाला नऊ हजार पाचशे रुपये एवढा विक्रमी दर मिळत आहे, एक नंबर कापसाला जवळपास अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत आहे. फरदड कापसाला उच्चांकी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या वेचण्या पूर्ण झाल्यानंतर देखील फरदड उत्पादणासाठी कापसाचे पीक अजूनही वावरातच उभे ठेवले आहे. मात्र असे असले तरी कापसाचे फरदड उत्पादन घेतल्याने अनेक विपरीत परिणाम होत असतात.
कापसाच्या फरदड उत्पादनामुळे आगामी हंगामात बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका कायम असतो तसेच यामुळे शेत जमीन नापीक होण्याची देखील शक्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या उच्चांकी बाजार भावाला भाळून न जाता यामुळे होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन कापसाचे फरदड उत्पादन घेणे टाळावे असा सल्ला कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. सततच्या वाढत चाललेल्या उत्पादन खर्चामुळे राज्यात या हंगामात कापसाच्या क्षेत्रात घट झाली त्यामुळे देखील उत्पादनात कमी आल्याचे सांगितले गेले. उत्पादन कमी झाल्याने कापसाला उच्चांकी दर मिळाला. असे असले तरी मध्यंतरी कापसाचा भाव कमी झाला असतांना अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मजूरटंचाई मुळे तसेच वाढत्या मजुरीमुळे कापसाच्या वेचणीसाठी अधिक खर्च होत असल्याने कापूस वेचणी पूर्णता थांबवली होती.
मात्र आता कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा देखील अधिक बाजारभाव प्राप्त होत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कापूस वेचणीस प्रारंभ केला आहे. एकंदरीत परिस्थीती बघता राज्यात अनेक ठिकाणी कापसाचे फरदड उत्पादन घेतले जात आहे. यामुळे सध्या जरी शेतकरी बांधवांना फरदड उत्पादनामुळे हात खर्चासाठी मुबलक पैसा उपलब्ध होत असला तरी यामुळे भविष्यात त्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणून फरदड उत्पादनाच्या मोहाला बळी न पडता शेतकरी बांधवांनी फरदड उत्पादन घेणे टाळावे.
Share your comments