आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवल्याने प्रशासनाची ताराबंळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी आपली गाडी थांबवून शेतकऱ्यांशी चर्चा केली.चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा शेतकरी-प्रकल्पग्रस्तांनी अडवल्याने खळबळ उडाली. मात्र यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. १५ वर्ष झाले तरी शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली.
३१ हजार कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस आणि प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा स्थळाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणातून जे पाणी चंद्रपूरच्या वाट्याला येणार आहे त्यातील घोडाझरी कालव्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. विविध कंत्राटदारांनी थातूरमातूर कामे करून हा प्रकल्प बंद डब्यात टाकला होता. महाविकास आघाडी सरकारने या कामाला आता गती देण्याचे निश्चित केले असून नागभीड तालुक्यातील या घोडाझरी कालवा स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे बाजूच्याच खुल्या मैदानावर हेलिकॉप्टरद्वारे पोहोचले.
प्रत्यक्ष कालवा स्थळी पोहोचून त्यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण योजनेची माहिती घेतली. हा घोडाझरी भूमिगत कालवा असून सुमारे ५५ किलोमीटर लांब भूमिगत वाहिन्याद्वारे पाणी शेतीला पोहोचविले जाणार आहे. मुख्यत्वे वनकायद्याचा अडसर असल्याने हे काम पूर्णत्वास जात नव्हते. कालवा स्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.गेली अनेक वर्षे गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्प घोषित झाल्यानंतरही यात कुठलाही विशेष बदल झालेला नाही. त्यामुळेच शेतीला पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेला हा दौरा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे.
दरम्यान हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या प्राधान्यक्रमाचा मुद्दा असून पुढल्या ४ वर्षात यासाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता यात असल्याची प्रतिक्रिया दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
Share your comments