मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करुन तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महिलांना नाव नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
या योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी किंवा फॉर्म भरुन देण्यासाठी पैशाची मागणी करू नये, या महिलांकडे कोणी पैशांची मागणी केली असे एखाद्या कार्यालयात निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
Share your comments