Beed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता हिंसक झाला आहे. बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून मंत्र्यांना आणि आमदारांना निशाना करण्यात आले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला करत बंगला पेटवून दिल्याची घटना घडली. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
"घरावर हल्ला झाला तेव्हा सर्व कुटुंब घरातच होतं. हल्ला मराठा समाजानं किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, अशा आशयाची फेसबुक पोस्ट आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
नेमकी काय आहे आमदार क्षीरसागर यांची पोस्ट
काल दि.30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.
मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल.
मराठा आरक्षणासाठी मा.श्री.मनोजजी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा.
सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे.
आपला
संदिप क्षीरसागर
आमदार, बीड विधानसभा मतदारसंघ
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड
Share your comments