Guardian Minister Adv. Manikrao Kokate News
नंदुरबार : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. नंदुरबारच्या नियोजन भवनात आयोजित 2025-26 या वर्षासाठीच्या खरीप पर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन केले.
कोकाटे यांनी सांगितले की, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बियाणे आणि औषध यांचे योग्य नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य गुणवत्ता असलेले इनपुट्स मिळावेत यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे. राज्यभरात बोगस बियाणे व औषध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, सुर्यफुल, कापूस, मुग, उडीद, तुर, सोयाबीन आणि भुईमुग यांसारख्या प्रमुख पिकांचे लागवड नियोजित आहे. यासाठी एकूण 27 हजार 194 क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. तसेच 1 लाख 41 हजार 550 मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, खत उत्पादक कंपन्यांना 97 हजार 300 मे. टन पुरवठ्याचे नियोजन देण्यात आले आहे. सद्यस्थितीत 8 हजार 544 मे. टन रासायनिक खत जिल्ह्यात उपलब्ध आहे.
कृषी विभाग व कृषी विद्यापीठात काही तांत्रिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ही पदे तात्काळ भरण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.राज्यातील खरीप हंगामाच्या नियोजनाच्या अनुषंगाने 31 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.
या बैठकीस माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त,सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर(तळोदा) अंजली शर्मा (नंदुरबार) राहूल कनवरिया (शहादा) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सी. के. ठाकरे, तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक व विषयतज्ज्ञ उपस्थित होते.
Share your comments