मुंबई : कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. अप्रमाणित, भेसळयुक्त व बनावट बियाणे, कीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.
या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरी, डॉ. मनीषा कायंदे, समीर कुणावर, संजय रायमुलकर, कैलास पाटील, बाबासाहेब पाटील, दिलीप बनकर, प्रकाश आबिटकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विधान भवन सहसचिव मेघना तळेकर व अधिकारी उपस्थित होते.
या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितले.
बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तू, बियाणे, कीटकनाशके आणि महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम या 4 कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते.
Share your comments