सध्या औसा तालुक्यातील खुंटेगाव शिवारात एका ७० वर्षीय वयोवृध्द शेतकऱ्याने एक भलतेच धाडस केले आहे. यामुळे याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळताच औसा पोलिसांनी विठ्ठ्ल पांढरे यांना अटक केली आहे. एवढेच नाही तर 1 लाख 50 हजारांचा मुद्देमालही त्याच्याकडून जप्त केला आहे. शेती पिकामधून अधिकचे उत्पन्न मिळत नाही म्हणून गेल्या काही दिवसांपासून गांजा शेतीचे प्रमाण वाढत आहेत. मात्र याची शेती करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत याच्या शेतीसाठी परवानगी देण्याची मागणीही सरकारकडे केली होती.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळी आणि नगर जिल्ह्यामध्ये असे प्रकार उघडकीस आले होते. विशेष म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये गांजाची लागवड केली जात आहे. अनेकांना याची कल्पना देखील लागत नाही. विठ्ठ्ल पांढरे यांनी शेतामधील गोठ्याला लागूनच गांजाची लागवड केली होती. सलग 30 झाडे लावली होती. असे असताना पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी थेट शेतात जाऊन याची पाहणी केली. त्यांनी लावलेली झाडे नष्ट करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांनी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
त्यांना औसा पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे गांजाची लागवड करणे त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. काही दिवसांपूर्वी याच तालुक्यात अशीच कारवाई करण्यात आली होती. ऊसाच्या फडात गांजा लागवड केल्याचे लक्षात येत नाही म्हणून शेतकरी आंतरपिकाप्रमाणे गांजा लागवड करीत आहेत. सध्या उसाचा गाळप हंगाम सुरु झाला असून यामुळे अशा प्रकारची प्रकरणे पुढे येत आहेत. यामुळे आता पोलिसही अधिक तपास करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अशी शेती केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. असे असताना सध्या वाइनची विक्री किराणा दुकानात करण्यास देखील सरकाने परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक शेतकरी हे पत्र लिहून गांजाची शेती करण्यास परवानगी मागत आहेत. सध्या याची शेती वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी याची शेती होत आहे. मात्र ते उघडकीस आल्यास थेट जेलची हवा खायला लागत आहे.
Share your comments