Chaundi Cabinet meeting news
मुंबई : चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्यासंदर्भात लोकमतमध्ये प्रकाशित जाहिरात चुकीची आहे. कॅामा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्राने अनवधानाने गल्लत केल्याने असा प्रकार झाल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
काल दि. 21 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती दीड कोटींची असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे. ती पुढारी आणि लोकमत अशा दोन वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. पुढारीत ती योग्य प्रकाशित झाली आहे. पण लोकमतमध्ये शेवटच्या दोन शून्यापूर्वी असलेला टिंब काढून टाकण्यात आल्याने ती 150 कोटींची दिसते. त्यामुळे काहींनी समाजमाध्यमांवर ती टाकली आणि काहींनी त्यावर आज बातम्या प्रकाशित केल्या.
वर्तमानपत्रांना दिलेला जाहिरातीचा रिलीज ऑर्डर किंवा संकेतस्थळावर ती बिनचूक आहे. केवळ एका वृत्तपत्राच्या मुद्रितशोधनाचा दोषामुळे अकारण शासनाची बदनामी करू नये. तसेच अकारण जनतेच्या मनात गैरसमज होऊ नये, यासाठी हा खुलासा प्रकाशित करावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. या सोबतच यापुढे जाहिरातीत निविदा रक्कम अंकांसोबतच अक्षरी सुद्धा नमूद करावी, अशाही सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत.
Share your comments