काल-परवा शरद पवार यांनी एका वक्तव्यातुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची (Sugarcane Producer) कान उघाडणी केली गेली होती तसेच त्यांना एक अनमोल सल्ला देखील दिला होता. पवार यांनी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न का निर्माण झाला त्याच्या मुळावर घाव घातला होता. याबाबत पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले होते की, ऊस ही आळशी शेतकऱ्याची शेती आहे. यामुळे फक्त ऊस पिकावर (Sugarcane Crop) अवलंबून न राहता हंगामी पिकांकडे (Seasonal crops) देखील शेतकरी बांधवांनी वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन तसेच फळबाग पिकांकडे आपला मोर्चा वळवावा असे पवार यांनी सांगितले होते.
शरद पवार यांच्या या सल्ल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडले आहेत. राजू शेट्टी यांनी एका फेसबुक पोस्ट मध्ये शरद पवार यांना एक खोचक प्रश्न विचारला आहे. शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिले कि, ऊस शेती आळशी माणसाचे पिक आहे तर मग आपल्या नातवंडाचे बारा साखर कारखाने कसे? या प्रश्नाव्यतिरिक्त शेट्टी यांनी पवार यांना ऊस उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी व कष्ट शब्दात बोलून दाखवले आहेत. शेट्टी यांनी पवार यांना सडेतोड उत्तर देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीचा पाढाच फेसबुकवर बोलून दाखवला आहे.
राजू शेट्टी यांनी एका फेसबुक पोस्ट मध्ये शरद पवार यांना उद्देशून आळशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लक्षणे लिहिले आहेत. शेट्टी यांनी पोस्ट मध्ये लिहले की,
ऊस पीक घेणे हे आळशी माणसाचं काम : शरद पवार
आळशी ऊस उत्पादकांची लक्षणे-
१)जमिनीची नांगरट करून सऱ्या सोडणे
२) वाकुरी मारणे
३) हिरवळीचं खत घेऊन ताग अथवा धैचा पेरणे
४) तीन पाण्याच्या पाळया देऊन हिरवळीचं खत गाडणे
५)लागणीसाठी ऊस तोडणे बी मांडणी आणि लागणी पुर्वीचा खताचा एक डोस टाकणे
६)पाण्याबरोबर लागण करणे
७)दोन वेळा आळवणी करणे
८)तीन वेळा भांगलणे
९)तीन वेळा रासायनिक खते, कीटकनाशक आणि फवारणी घेणे
१०)बाळ भरणी करणे
११)जेटा मोडणे,खताचे तीन डोस घेणे
१२)भरणी करणे
१३)दर पंधरा दिवसांनी रात्री अपरात्री उसाला पाणी देणे
१४)उसाच्या कर्जासाठी बैंक सोसायटी कडे हेलपाटे मारणे
१५)उसाच्या नोंदीसाठी चिटबॉयला खुश करणे
१६)ऊसाच्या तोडीसाठी कारखान्याचा संचालक ते चिटबॉय यांच्या हाता पाया पडणे
१७)चिटबॉय मुकादमाला धाब्यावर पर्यटनाला घेऊन जाणे
१८) ऊस तुटल्यानंतर वेळेवर FRP चे पैसे मिळावेत म्हणून मोर्चे काढणे
१९) केसेस अंगावर घेणे
२०) कोर्टाचे हेलपाटे मारणे
आळशी ऊस उत्पादकाला वठणीवर आणण्यासाठी उपाय योजना -
१) या आळश्यांच्या जिवावर जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक,कारखान्याचे संचालक चेअरमन यासारखी बांडगुळ पोसुन VSI सारखा पांढरा हत्ती सांभळणे
२) या आळशांनी पै पै गोळा करुन ऊभारलेला सहकारी तत्वावरचा कारखाना मोडून खाणे
३) एफ आर पी चे शक्य तेवढे तुकडे करुन या आळशांना देशोधडीला लावणे.
४) कारखाना परिसरातील ऊस शिल्लक ठेवून कारखाना गाळप बंद करणे, काटा मारणे , उता-यात फेरफार करणे.
५) एकरकमी एफ आर पी देणा-या कारखान्याच्या कार्यक्रमात जाऊन एफ आर पी दोन टप्प्यात द्यावी लागेल अशी खंत व्यक्त करणे.
पवार साहेब या उपाय योजना आमलात आणुन ऊस उत्पादकाला लवकरात लवकर धडा शिकवावा. असे देखील यावेळी राजू शेट्टी यांनी पवार साहेबांना सुचवले आहे. एकंदरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी पवारांच्या वक्तव्यावर चांगलाच मोठा घणाघात केला असल्याचे समजत आहे.
Share your comments