1. बातम्या

Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेबाबत राष्ट्रवादी आक्रमक; एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी

जवळपास ४ वर्षानंतर तलाठी भरती परीक्षा होत असल्याने तब्बल दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. मात्र भरती परीक्षेदरम्यान अनेक जिल्ह्यांत परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

Jayant Patil Letter on Talathi Exam

Jayant Patil Letter on Talathi Exam

मुंबई

राज्य शासनाच्या तलाठी भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. परिक्षा सुरु होताना झालेल्या सर्व्हर डाऊन प्रकाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांना पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यांच्याकडे केली आहे.

शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी या परीक्षांमध्ये उमेदवारांना अडचणी येत असून उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे.

जयंत पाटील पत्रात म्हटले आहे की, जवळपास ४ वर्षानंतर तलाठी भरती परीक्षा होत असल्याने तब्बल दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. मात्र भरती परीक्षेदरम्यान अनेक जिल्ह्यांत परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तसेच परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे.

नाशिक येथील एका परिक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली. परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत असल्याचे प्रकार देखील घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर येथील परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठविण्यात आल्याचे समजते. यापूर्वी वनविभागाच्या भरतीसंदर्भात देखील असेच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे असे त्यांनी आपल्या पत्रात सांगितले.

म्हाडा भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या ६० आरोपीवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत, अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सरकारने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि प्रामाणिक परीक्षार्थींना न्याय द्यावा. तसेच असे प्रकार पुनश्चः घडू नयेत व शासकीय गट 'क' व गट 'ड' पदांची भरती पारदर्शकपणे होण्याकरीता कायम स्वरुपी यंत्रणा निर्माण करावी. याकरीता केंद्र शासनाच्या कर्मचारी चयन आयोगाच्या (Staff Selection Commission) धर्तीवर राज्य शासनाने स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्येच गट 'क' व गट 'ड' पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करुन त्यामार्फत या पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी शेवटी केली.

English Summary: Talathi Exam Nationalist Aggressive on Talathi Recruitment Exam Demand for inquiry through SIT Published on: 23 August 2023, 01:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters