कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्राची ओळख दर्शवणारी पिके विकसित करायला हवी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मंगळवारी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे चांगले काम करत आहेत. परंतु त्यांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला आणखी पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज आहे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करतांना विभागावर निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे. अशा उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल याचाही विचार झाला पाहिजे.
दूध, कांदा, कापूस अशा वेगवेगळ्या पिकांबाबतीत असलेली अनिश्चितता संपवायची आहे यासाठी प्रत्येक पिकाचे, वाणाचे वेगळेपण ओळखून पिके घ्यावीत. त्यासाठी महाराष्ट्राची विभागवार मांडणी करून फळ, धान्य, प्रक्रिया उद्योग यांची निश्चिती करावी, त्यांचा दर्जा राखताना आपली उत्पादने जागतिक दर्जाची आहेत का, याचा अभ्यास करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
Share your comments