काथ्या उद्योगाद्वारे शाश्वत रोजगार निर्मिती

Saturday, 02 February 2019 08:36 AM


सिंधुदुर्ग:
झोळंबे येथे काथ्या प्रक्रिया उद्योग सामुहिक सुविधा केंद्र लवकरच सुरु होत आहे. यामुळे झोळंबे, तळकट, कळणे गावच्या पंचक्रोशीतील महिलांना रोजगाराचे नव दालन सुरु होईल. चांदा ते बांदा योजने अंतर्गत सुमारे पन्नास लक्ष रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपलब्ध होईल. काथ्या उद्योगाद्वारे महिलांसाठी शाश्वत रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी झोळंबे ता. दोडामार्ग येथे बोलताना व्यक्त केले.

झोळंबे ता. दोडामार्ग येथे चांदा ते बांदा योजनेखाली महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळामार्फत काथ्या उद्योग सामुहिक सुविधा केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसभापती धनश्री देसाई, जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई, तहसिलदार ओंकार ओतारी, बाबुराव धुरी, गणेश प्रसाद गवस, विजय जाधव, सज्जन धाऊसकर, मिलिंद नाईक, भिवा गवस, सतिश कामत, गणपत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

झोळंबे-तळकट पंचक्रोशीतील महिलांनी याबाबत प्रशिक्षण पूर्ण करावे असे सांगून पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु झाले की, या ठिकाणी काथ्या पासून रबरी मॅटिंग बनविण्याचे टफ्टींग युनिटही सुरु केले जाईल. महाराष्ट्र जिवनोन्नती अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांसाठी जिल्ह्यात बावीस कोटी रुपये निधी आला आहे. झोळंबे-तळकट रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक मधून केला जाणार असून यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर आहे. चांदा ते बांदा अंतर्गत शेळी व गाय पालन तसेच कोंबडी पालनातून हॅपी एग्ज या योजनेतही महिलांनी मोठ्या प्रमाणावर उन्नती साधावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी प्रकल्प संचालक राजेश कांदळगावकर यांनी प्रास्ताविकात काथ्या प्रक्रिया व प्रशिक्षणा बाबत सविस्तर माहिती दिली. झोळंबे सरपंच राजेश गवस यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. समारंभास झोळंबे, कळणे व तळकट पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Deepak Kesrakar दीपक केसरकर काथ्या coir Sindhudurg सिंधुदुर्ग चांदा ते बांदा योजना Chanda te Banda Yojana

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.