खरीप हंगामाचे दिवस जवळ येत आहे. बळीराजा कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. यावर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली.
पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये, त्याप्रकारे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र येथे व्हर्च्युअल (दूरचित्रवाणी परिषद) पद्धतीने खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, कृषि सभापती राजेंद्र पळसकर आदी उपस्थित होते. तर एनआयसी केंद्रात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे उपस्थित होत्या. तसेच विभागप्रमुख, अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
बोगस बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाची सरासरी गृहीत धरून आर्थिक मदत देण्यासाठी कंपन्यांकडून लेखी हमीपत्र घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, बोगस बियाणे निघाल्यास कंपन्या तुटपुंजी मदत देतात. यावेळेस कृषि विभागाने बियाणे कंपन्यांकडून लेखी हमी घ्यावी, जर बोगस बियाणे निघाले व शेतकऱ्याचे नुकसान झाले तर, वार्षिक उत्पन्नाचे सरासरी गृहीत धरून कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी.
गुणनियंत्रणासंदर्भात विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करावी. या पथकांकडून खते, बियाणे व किटकनाशक दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 30 मे पर्यंत 50 टक्के व 15 जुनपर्यंत 80 टक्के कृषि पतपुरवठा पूर्ण करण्यात यावा. बँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पिक कर्ज वितरण पूर्ण करावे. त्यासाठी सातत्याने आढावा घ्यावा, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.
Share your comments