शेतकऱ्यांनी अलीकडील काळात ज्वारी व हरभरा पिकाला अधिक पसंती दिल्याने मागील आठ-दहा वर्षांपासून रब्बी हंगामातून तेलवर्गीय असलेल्या करडई व सूर्यफूलाचे पीक नाहीसा होत आहे. यंदा यांचे क्षेत्र शून्य टक्क्यावर असल्याचे महसूल व कृषी विभागाकडील आकडेवारीवरून दिसते. पाचोडसह पैठण तालुक्यातील हे पिके कमी झाली आहेत.
शासनाने तेलबिया उत्पादन व प्रक्रिया उद्योगात असलेली संधी विचारात घेऊन खाद्यतेल धोरणाला अनुसरून यंदा महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) अभियानाच्या माध्यमातून करडईचे नामशेष होणारे क्षेत्र जगविण्यासाठी यंदा शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम राबवून करडई लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. परंतु बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या करडई व सूर्यफुलाचे क्षेत्र अक्षरश: शून्य टक्क्यावर येऊन हे तेलवर्गीय पीक हद्दपारच झाले आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांनो घाबरू नका! कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी सहज मिळेल कर्ज
पूर्वी करडई सर्वात फायदेशीर पीक समजले जात असे. अवेळी पाऊस, विविध रोगांचा प्रादुर्भाव, तसेच इतर स्पर्धात्मक पीक सूर्यफूल व करडईचे बाजारात इतर पिकांच्या मानाने दर कमी असल्याने हे क्षेत्र घटण्याची प्रमुख कारणे आहेत. शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या ज्वारी, गहु, सोयाबीन पिकांकडे वळाल्याने हे पीक नाहीसा झाले आहे.पूर्वी रब्बी हंगामात ज्वारीबरोबर करडईचे पीक घेतले जात असे, तर शेतकरी खरिपासह रब्बीत सूर्यफूल घेत होते. मात्र आता करडई व सूर्यफूल पिके घेण्याकडे सर्वच शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
आज सर्वत्र करडई व सूर्यफूलपासून उत्पादित तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या करडई व सूर्यफूलास अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ही पिके घेण्याकडे पाठ फिरवून सोयाबीन, ज्वारी व हरभऱ्यास पसंती दिली आहे. पूर्वी आहारात करडईचे तेल वापरणे प्रतिष्ठेचे व आरोग्यवर्धक मानले जात असत. परंतु आजकाल करडई दुर्मिळ झाली. पूर्वी गहू, ज्वारी, हरभरा पिकांच्या सहा ते ओळीनंतर (पाटे पद्धतीने) करडईचा पेरा होत असे. या पिकांची निवड करताना कमी खर्च व कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन देणाऱ्या अन् अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैठण तालुक्यात करडईची पेर साधली जात होती. मात्र आता पैठण तालुक्यात सूर्यफूल व करडईचे क्षेत्र इतिहास जमा झाले.
तुर्तास पैठण तालुक्यात करडईच्या वाट्यात काटे येऊन हे पीक इतिहास जमा होताना झाले. करडई पाठोपाठ सूर्यफुलाचेही क्षेत्रघटीचेही तेच कारण असून याचेही क्षेत्र शुन्यावर आले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून करडई व सुर्यफूल या तेलबियाच्या शेतीकडे वळावयास हवे.
Share your comments