ऊसाची तोडणी तसेच वाहतुकीच्या नावाखाली बीलांमध्ये साखर कारखाने नको तो खर्च घुसवत असून कोट्यावधी रुपये वसूल करीत असल्याची बाब साखर सहसंचालकांना सादर केलेल्या तपासणी अहवालात उघडकीस आली आहे.
त्यामुळे आता सर्व साखर कारखान्यांच्या तोडणी आणि वाहतुकीचा खर्च तपासला जाण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोडणी व ऊस वाहतुकीच्या बिलांमध्ये नको तो खर्च दाखवला व तो शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाच्या तक्रारी साखर सहसंचालकांकडे करण्यात आल्या होत्या. त्यासाठी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चूड मुंगे यांनी पुराव्यानिशी पाठपुरावा केला.त्यामुळे काही कारखान्यांना याबाबतीत नोटिसा बजावण्यात येऊन संशयास्पदरीत्या लावण्यात आलेला खर्चाची तपासणी करण्यात आली.
.कारखान्यांना मनाप्रमाणे कोणत्याही प्रकारचा खर्च तोडणी व वाहतूक बिलामध्ये टाकून वसूल करता येत नाही.महाराष्ट्र ऊसदर विनियमन 2016 मधील नियम 8 ( ड ) नुसार कोणता खर्च गृहीत धरावा हे कारखान्यांना सांगण्यात आलेले आहे. तरीही नियमबाह्य खर्च सुद्धा शेतकर्यांकडून कपात करण्याचा प्रयत्न झाला ही वस्तुस्थिती आहे.अशा कपातीमुळे शेतकऱ्यांना मिळणारी एफआरपी कमी मिळणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर साखर सहसंचालकांनी विशेष लेखापरीक्षक आन कडून केलेल्या तपासणीत खर्चातील घोळ उघड झालेला आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर खर्चाच्या रकमा वगळण्यात आल्यावर त्यानंतर सुधारित एफ आर पी काढण्यात आली.
संबंधित कारखान्यांना आम्ही एफ आर पी चे आधीचे हिशोब रद्द करायला भाग पाडून शेतकऱ्यांना सुधारित दराने एफआरपी देण्याचे आदेश दिलेले आहेत असे सहसंचालक कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यभर अशी लुबाडणूक झाल्यामुळे विविध जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांनी तयार केलेल्या तोडणी व वाहतूक खर्चाच्या बिलांची तपासणी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांचे आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचीकाल एका शिष्टमंडळाने भेट घेतली.
Share your comments