सध्या राज्यात सगळीकडे ऊस गळीत हंगाम सुरु आहे. अनेक ठिकाणी उसाच्या दरावरून शेतकरी नाराज असताना आता ऊसतोडणीला देखील विलंब होत असल्याने शेतकरी नाराज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तुरे आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेक कारखान्यांची विस्कळीत झालेली ऊस तोडणी यंत्रणा यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारी संपत आला तरी सातारा जिल्ह्यातील बहुतांशी काखान्यांचा ऊस तोडणीचा कार्यक्रम अजूनही जूनच्या पहिल्याच सप्ताहातील सुरू असल्यामुळे ऊसतोड येण्यास विलंब होत आहे.
यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. उसाच्या वजनात यामुळे घट होणार आहे. तसेच पुढील पिकाचे नियोजन यामुळे फिस्कटणार आहे. अनेक शेतकरी उसाचे पीक गेले की गहू, तसेच इतर कमी कालावधीच्या पिकाचे उत्पादन घेतात. मात्र यामुळे आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात यावेळी ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू झाला होता. दरासंदर्भात काही प्रमाणात ऊस आंदोलन झाली मात्र काही कारखान्यांनी पूर्ण एफआरपी तर काही कारखान्यांनी ८०-२० फॉर्म्युला स्वीकारत ऊस बिले काढली आहेत. यामुळे शेतकरी आधीच नाराज आहे.
असे असताना पावसाचे गेल्या दोन वर्षात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, खटाव, खंडाळा, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात उसाचे क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शेतकरी या कमी कष्टाच्या उसाच्या शेतीकडे वळाले आहेत. यामुळे कारखान्यांवर उसतोडणीचा ताण आला आहे. तसेच अनेक कारखाने आर्थिक संकटांचा सामना करत असल्याने त्यांना ऊस घालण्यास शेतकरी टाळाटाळ करत आहेत. यामुळे ज्या कारखान्यांची परिस्थिती चांगली आहे, त्याच कारखान्यावर उसतोडणीचा ताण आला आहे.
या हंगामात गाळपासाठी मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र शिल्लक आहे. उत्पन्न वाढ व लवकर ऊस तुटावा यासाठी आडसाली ऊस घेण्याकडे कल वाढला आहे. ऊस हंगाम सुरू झाल्यावर अवेळी जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोडणी यंत्रणा ठप्प झाली होती. पावसामुळे वाया गेलेले दिवस तसेच अनेक कारखान्यांची विस्कळित झालेली तोडणी यंत्रणेचा परिणाम दिसू लागला असून संथगतीने सुरू आहे. अजूनही उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने हंगामही लांबणार आहे. यामुळे यंत्रणा उभी करून लवकरात लवकर ऊसतोडणी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Share your comments