सततची अतिवृष्टी, पुरामुळे महाराष्ट्राचे हक्काचे पीक असलेली ऊस शेतीदेखील धोक्यात आली आहे. या अशा बिघडलेल्या निसर्गचक्रात उसाला पर्याय म्हणून कोल्हापुरात शर्कराकंद लागवडीचा पर्याय पुढे आला आहे. महापुरातील शेतीचे नुकसान सतत होत असल्याने पर्यायी पिकांचा शोध हा शास्त्रज्ञांचा अभ्यास विषय झाला आहे.
शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने याबाबत कृतिशील पावले टाकली आहेत. त्यामध्ये शर्कराकंद (शुगर बीट) लागवड हा उल्लेखनीय म्हणावा, असा प्रयोग आकाराला आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती आणखीच निराळी. मुळात हा भाग पश्चिम घाटाचा. सह्याद्रीच्या कुशीतील पश्चिमेकडच्या भागात पावसाचे प्रमाण खूपच अधिक असते. पावसाचे, पुराचे हे सारे पाणी येऊन थांबते ते पूर्वेकडील शिरोळ तालुक्यात. कृष्णा, पंचगंगा, वारणा,दुधगंगा नद्यांच्या हा भाग महापुराच्या विळख्यात सापडतो तो याच तालुक्यात. इथे दोन कारखाने आहेत.
शिवाय या तालुक्यातील ऊस किमान डझनभर साखर कारखान्यांना गाळपासाठी जातो. तालुक्यातील एकंदरीत जमिनीपैकी ८५ टक्के जमिनीचे क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. भाजीपाला, अन्य शेतमालाचे महापुराने मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. वारंवार असाच महापूर धक्के देत राहिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आणि साखर उद्योगाचे पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत पर्यायी पिकांचा शोध हाच यावरचा उपाय असू शकतो. या दृष्टीने काहीएक शोध घेणे हे राज्यशासन, शेतकरी, शेतकरी संघटना, कृषीपूरक व्यवसाय, व्यावसायिक, कृषी शास्त्रज्ञ यांच्यासमोर एक आव्हान आहे.
श्री शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने महापूर ओसरल्यावर म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये कृषी तज्ज्ञांच्या उपस्थितीत पाऊस, महापूर आणि त्यावरील पर्याय या विषयावर चर्चासत्र घेतले होते. या मंथनातून सतत महापुराचे सावट असणाऱ्या भागात शर्कराकंद लागवडीचा पर्याय पुढे आला. त्यावर केवळ चर्चा झाली नाही, तर हा प्रयोग कृतिशीलपणे राबवण्याचा निर्णय घेतला. दत्त साखर कारखान्याच्या कार्यकारी क्षेत्रातील ४१ गावांमध्ये सुमारे ५० एकरावर प्रत्यक्ष लागवड केली आहे. ५६ सभासदांच्या शेतीवर उसाला पर्यायी पीक म्हणून शर्कराकंद पीक बहरात आले आहे.
अन्य काही पर्याय
काही गावांमध्ये पेरू, आंबा, चिकू आदी फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिलेले आहे. महापुरात तग धरणारे उसाचे बियाणे शोधून त्याचे संवर्धन करण्याकडे लक्ष पुरवले आहे. याच्या जोडीला अधिक लक्ष दिले आहे ते शर्कराकंद लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचे. केवळ प्रवृत्त करण्याचे नाही तर शेतकऱ्यांना त्याची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. कोठे एक एकर, कोठे अर्धा एकर.. ज्याला जमेल तितके; तशी शर्कराकंदची लागवड केली आहे. जुलै महिन्यातील धुवाधार पाऊस ओसरल्यानंतर ऑगस्टमध्ये शर्कराकंदची लावण करण्यात आली आहे. त्याची शास्त्रशुद्ध निगा केल्यामुळे पीक जोमाने उगवले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट मधील शास्त्रज्ञ, दत्त साखर कारखान्यातील शेती विभाग यांच्या मार्गदर्शनातून शर्कराकंद (शुगरबीट) योग्यरीत्या उगवले आहे.
शर्कराकंदच का?
दत्त साखर कारखान्याने महापुराला पर्यायी पीक म्हणून शर्कराकंदची निवड करण्याची विशेष अशी काही कारणे आहेत. मुख्य म्हणजे हे पीक महापुराचा काळ ओसरल्यानंतर घेता येते. ऑगस्टमध्ये त्याची लागवड केली की मार्चमध्ये त्याचे गाळप करता येते. शर्कराकंद हे थंड हवामानात उत्तमरीत्या पिकते. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा आपल्याकडे थंडीचा कालावधी असतो. परिणामी पिकाची वाढ जोमाने होऊ शकते. शिरोळ तालुक्यातील गावोगावी पिकलेल्या शर्कराकंदची उगवण पाहता याची खात्रीही पटते. अधिक पाण्याची गरज नाही. क्षारपड जमिनीत उत्तम उत्पादन होते. पिकातील साखरेचे प्रमाण सुमारे १८ टक्के असते.
अन्य पिकांच्या तुलनेत किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी. एकरी ८० हून अधिक िक्वटल उत्पादन. साखर, इथेनॉल, पशुखाद्य याची निर्मिती शक्य होते. दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून वापर तर होतोच, शिवाय या खाद्याद्वारे जनावरांच्या दुधाच्या गुणवत्तेत वाढ होते. त्याचे अनेक लाभ या बहुगुणी पिकाचे आहेत. शर्कराकंदची लागवड ४० बाय १५ सेमी अंतराने केली जाते. ५० बाय १५ किंवा ४० बाय २० असे पर्यायही आहेत. युरोप, इराण येथील कंपन्यांचे वाण भारतात उत्पादित केलेले आहेत. नत्र,स्फुरद, पालाश ३० किलो वापरावे लागते. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात. पाण्याचा वापर जपून करावा लागतो. अधिक पाण्यामुळे वाढ खुंटते. कंद कुजतात. कीड लागणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते.
Share your comments