राज्यातील 2018-19 या चालूवर्षीचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. साखर संकुल येथे ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींशी बैठक सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.राज्यातील सर्व उसाचे गाळप वेळेत करण्याचा प्रयत्न राहील. औरंगाबाद विभागात कारखाने कमी आणि यंदा ऊस जादा आहे. त्यामुळे या विभागाच्या नियोजनासाठी स्वतंत्र आढावा बैठक घेतली जाईल. राज्यातील कोणते कारखाने सुरू होतील. कोणते आजारी कारखाने सुरू करता येतील, याबाबत आढावा घेतला जात आहे. आजारी कारखान्यांपैकी किमान 10 कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यामुळे यंदा एकूण 195 च्याआसपास कारखाने चालू होतील, असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
मागील हंगामात साखरेचे दर घसरल्यामुळे काही कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले आहेत. ताळेबंद उणे असल्यामुळे या कारखान्यांना नवे कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. याबाबत श्री. देशमुख म्हणाले, की नाबार्ड, शिखर बॅंक, कारखाने प्रतिनिधींची एक समिती तयार करून शासनासमोर उपाय मांडले जातील. कारण, गाळप पूर्ण क्षमतेने व्हावे, शेतकऱ्यांना पैसा मिळावा आणि बॅंकांचे कर्जदेखील वसूल व्हावे, अशी भूमिका ठेवूनच नियोजन केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील साखर कारखान्यांच्या ठिबक ऊस लागवड योजनेचा आढावा घेणार आहेत.
चालू हंगामातही ऑनलाईन गाळप परवाने देणार
मागील वर्षीप्रमाणे या हंगामात गाळप परवाने ऑनलाईन पद्धतीने दिले जातील. तसेच वजन काट्याची तपासणी करण्याकरिता भरारी पथकाची नेमणूक करण्यात येईल. कोणत्याही कारखान्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, असे सहकारमंत्री देशमुख म्हणाले. मजुराच्या समस्येवर ऊस तोडणी यंत्र योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी या बैठकी दरम्यान करण्यात आली.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:
- आजारी कारखाने सुरु करण्यासाठी प्रयत्न
- कारखान्यांकडून थकीत रक्कम देणेबाबत
- कारखान्यांना नवीन कर्ज मिळण्यातील अडचणी
- यंदाही गाळप परवाने ऑनलाईन पद्धतीने
- वजन काट्याची तपासणी करण्यासाठी भरारी पथके
- ऊस तोडणी यंत्र योजना सुरु करणेबाबत
Share your comments