सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्र व सर्वाधिक साखर कारखाने आहेत. यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात आले. यावर्षी जून महिन्यात सर्वत्रच पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा प्रदीर्घ काळासाठी खंड पडला. यामुळे हुमणीच्या आळ्या बाहेर पडल्या व त्यांनी ऊसाच्या मुळावरच घाव घातला आहे. जिल्ह्यातील माढा, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस व करमाळा तालुक्यातील १० ते १२ हजार हेक्टरवरील उसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाला असून, बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. आठवडाभरापासून कृषी व महसूल खात्याचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत.
जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील सुमारे १२ हजार हेक्टर ऊस क्षेत्र हुमणीने बाधित झाले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले. साधारण आॅगस्ट महिन्यात हुमणीचा प्रादुर्भाव सुरू झाला. हे लक्षात आल्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाने यावर करावयाच्या उपाययोजनांचे शेतकऱ्यांना प्रबोधन सुरू केले. साखर कारखान्यांना शेतकरी मेळावे घेऊन हुमणीवर करावयाच्या उपाययोजनांचे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिले. साखर कारखाना व कृषी खात्याच्यावतीने प्रत्येक तालुक्यातील हुमणी बाधित क्षेत्र परिसरात शेतकऱ्यांचे जनजागृती मेळावे घेण्यात आले. यामुळे सध्या हुमणी आटोक्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित लेख वाचण्यासाठी: हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन: डॉ. पांडुरंग मोहिते
ज्या भागात उजनी व नीरा धरणातून तसेच नदीद्वारे पाणी मिळते त्या भागात हुमणीच्या प्रादुर्भावाने ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. तर पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रातील उसाची वाढ पाण्याअभावी थांबली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्र असले तरी हुमणी व दुष्काळामुळे वजनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होणारच आहे, शिवाय कारखान्यांसाठीही त्रासाचे आहे.
हुमणीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम मागील आठवडाभरापासून सुरू झाले आहे. कृषी खात्याचे कर्मचारी तसेच तलाठ्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आठवडाभरात हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाला बाधित क्षेत्राची आकडेवारी कळविण्यात येणार असून, नुकसान भरपाईबाबत शासनच निर्णय घेईल, असे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
Share your comments