ऊस गाळपात भारत देशात महाराष्ट्र हा प्रथम स्थानी आहे ही जेवढी अभिमानाची गोष्ट आहे तेवढीच दुसऱ्या बाजूला पडलेली आहे. कारण ऊस गाळपामध्ये प्रथम स्थानी जो महाराष्ट्र आहे त्याच महाराष्ट्रात ऊस तोडणीचा प्रश्न रखडलेला आहे. उसाचा हंगाम अंतिम टप्यात असताना जवळपास महाराष्ट्र राज्यात १५ ते २० टक्के ऊस अजून फडातच आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने जरी उसतोडणीचे आश्वासन दिले असले तरी अजून त्याची काय अमलबजावणी होत नाही त्यामुळे जिल्ह्यातीलच ऊस उत्पादन आता यावर पर्याय काढत आहेत. आतापर्यंत कारखान्यांनी उसाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचे गाळप केले परंतु इथून पुढून कारखाने आधी कार्यक्षेत्रातील उसाची तोड करतील आणि नंतर कार्यक्षेत्रातील बाहेरच्या उसाचा विचार करावा अशी भूमिका बीड येथील ऊस उत्पादकांनी घेतलेली आहे. १० मार्च ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. जर कारखान्यांनी बाहेरची तोडणी केली तर हद्दीवर गाड्या अडविल्या जातील असा ऊस उत्पादकांनी इशारा दिलेला आहे.
नोंदणी करुनही ऊस फडातच :-
ऊस लागवड केल्याची नोंदणी ही शेतकऱ्याने कारखान्यात केलेली असते जे की यानुसार उसतोडीचा कार्यक्रम चालतो. मात्र यावेळी साखर कारखान्याचे गणित बिघडले असून १४ महिने जरी झाले तरी अजून ऊस हा फडातच आहे. जर वेळेत उसाचे गाळप झाले नाही तर उसाच्या वजनात घट ही होते आणि उत्पादनात सुद्धा घट होते. उदासिनतेमुळे यावेळी उसाचे गाळप होतेय की नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजकिय संबंध चांगले जोपासण्यासाठी कारखाने कार्यक्षेत्राबाहेरच्या उसाचे गाळप करत आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटणार :-
उसाचा हंगाम जरी टप्यात आला असला तरी कारखाने जिल्ह्याबाहेरचे उसाचे गाळप करत आहेत. जो उरलेला काळ आहे त्या काळात तरी जिल्ह्यातील उसाचा विचार कारखान्यांनी करावा यासाठी जिल्ह्यात बैठका पार पडत आहेत. रविवारी बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची बैठक पार पडली असून १० मार्च नंतर जर बाहेरच्या जिल्ह्यातील ऊस गाळप केला तर उसाचा ट्रक हद्दीवरच अडवला जाईल असा ईशारा शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी दिलेला आहे.
काय आहेत साखर आयुक्तांचे आदेश?
यंदा उसाचे मोठ्या प्रमाणात गाळप झाले आहे तरी सुद्धा अजून उसाची तोड शिल्लकच आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असल्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा यंदा जास्त दिवस गाळप सुरू आहे. शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होऊ नये याची जबाबदारी आयुक्त कार्यालयाकडून घेतली जात आहे. तर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे की जो पर्यंत अतिरिक्त उसाचे गाळप होत नाही तो पर्यंत गाळप बंद केले जाणार नाही. तसेच जो पर्यंत आयुक्त कार्यालय गाळप बंद करण्याची परवानगी देत नाहीत तो पर्यंत कारखाना गाळप बंद करणार नाही.
Share your comments