साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा

Monday, 11 March 2019 07:57 AM


सातारा:
आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचा बाजारभाव पडलेला आहे, अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत किसनवीर परिवाराचे हे काम पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या तृतीय डिस्टीलरी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ कारखाना परिसरात उभारण्यात येणाऱ्या अमर जवान स्मारकाचे भूमिपूजन पुलवामा हल्ल्यात जखमी झालेले जवान सुशांत प्रमोद वीर यांच्या हस्ते करण्यात आले. अमर जवान उद्यानात 43 आजी-माजी सैनिकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाडवे, वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, माजी आमदार कांताताई नलवडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राज्य बँकेचे प्रतिनिधी अविनाश महागावकर, भरत पाटील, विक्रम पावसकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. बी. जाधव, विनीत कुबेर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर अत्यंत कमी आहेत. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी इतर उपपदार्थांच्या निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. किसन वीर कारखान्याने तिसऱ्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या माध्यमातून ही किमया साधली असून किसन वीर कारखान्याच्या सभासदांना याचा निश्चित फायदा होणार आहे.

किसन वीर परिवाराच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक भान हे किसन वीर परिवाराचे वैशिष्ट्य आहे. 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देण्यासाठी कारखाना परिसरात उभारण्यात आलेले शहीद स्मृतीवन स्मारक अत्यंत प्रेरक आहे. तर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी अमर जवान स्मारक उभारण्याचा कारखान्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. उरी येथील हल्ल्यानंतर भारताने मोठा सर्जिकल स्ट्राईक करत मोठी कामगिरी बजावली होती. त्याचप्रमाणे पुलवामा येथील भ्याड हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे भारताविषयी चांगला संदेश जगभरात गेला असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. या ठाम भूमिकेमुळे भारत कणखर देश असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भारताचा प्रत्येक नागरिक उभा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

श्री. मदन भोसले म्हणाले, अडचणीच्या काळात किसन वीर सहकारी साखर कारखान्याला शासनाने मदतीचा हात दिला, त्यामुळे साखर कारखाना पुन्हा गत वैभवाने उभा राहील. राज्यातील सहकारी कारखान्यांना दिशादर्शक ठरणारा स्पेंन्ट वॉश टू सीएनजी हा प्रकल्प आम्ही किसन वीरच्या माध्यमातून उभा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भाषणे झाली.

यावेळी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्यावतीने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख 51 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुलवामा हल्ल्यातील सातारा जिल्ह्यातील रुई-शेंदुर्जणाचे सुपुत्र जखमी जवान सुशांत प्रमोद वीर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी किसन वीर सहकारी कारखान्याचे सभासद, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Devendra Fadnavis Kisanveer Satara Sahakari Sakhar Karkhana kisanveer देवेंद्र फडणवीस किसनवीर

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.