शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्ण हतबल झाला आहे, आणि आता शेतमालाचा पडता बाजारभाव शेतकऱ्याचे कंबरडे मोडू पाहत आहे. आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाचा यावर्षी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय जे पीक बऱ्यापैकी पदरात पडलेय त्याचे बाजारभाव कवडीमोल झाले आहेत. यावेळेस पपई आणि अद्रकचे चांगले विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
पण ह्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे चांगले उत्पादन पदरी पडूनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. मराठवाड्यात तर अद्रकची खरेदी देखील होत नाहीय. शेतकऱ्यांना अद्रकच्या बियाण्यासाठी सुमारे 40 रुपये किलोने पैसे मोजावे लागले आहेत मात्र, अद्रक हा फक्त 7 रुपये किलोने विकला जात असल्याने, शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.
अद्रकची झाली मागणी कमीबाजारात अद्रकला नेहमी मागणी असते, व त्याला चांगला बाजारभाव मिळत असतो. परंतु यावर्षी अचानक अद्रकच्या मागणीत लक्षणीय घट घडून आली याचाच परिणाम म्हणून बाजारभावात कमालीची घसरण बघायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी अद्रकचे उत्पादन वाढले पण याचा अद्रक उत्पादक शेतकऱ्याला काही फायदा झाला नाही. अद्रकचे बियाणे हे चार हजार रुपये क्विंटल प्रमाणे जिल्ह्यात मिळत आहे आणि अद्रक मात्र 700 रुपये क्विंटलने विकला जातोय. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की केवढा तोटा अद्रक उत्पादक शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे.परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की अद्रक खरेदीसाठी व्यापारी देखील मिळत नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला अद्रक विकायचा कसा आणि कुठे हा प्रश्न पडला आह.
उत्पादन विक्रमी मात्र उत्पन्न….यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी मुख्य पीक म्हणून अद्रक लागवड केली, पण त्यांचा हा डाव उलटा पडताना स्पष्ट दिसत आहे. त्याचे झाले असे यंदा पाऊस हा अपेक्षेपेक्षा जास्त पडला आणि याचा फायदा अद्रक पिकाला झाला आणि उत्पादन वाढले, पण मागणी नसल्याने अद्रकचा भाव हा चांगलाच कोलमडला, त्यामुळे उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही, उलट शेतकऱ्यांना आलेला लागवड खर्च देखील निघणे मुश्किल वाटत आहे.
Share your comments