हळदीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर १६ हजार रुपयेप्रमाणे बेण्यांसाठी, तर हळद प्रक्रियेच्या साहित्यासाठी २५ लाखांपर्यंतच्या खर्चापैकी ४० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
जगातील हळदीच्या उत्पादनापैकी जवळपास ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते; परंतु त्यापैकी केवळ १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश असून, त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये हळद पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून, उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. तथापि, हळदीच्या दरामधील चढ-उतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींमुळे शेतकरी या पिकाचा फारसा विचार करीत नाहीत. याच समस्यांचा विचार करून शासनाने हळद लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे.
हळदीच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. यांतर्गत शेतकऱ्यांना सद्यस्थितीत बेण्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १६ हजार रुपयेप्रमाणे अनुदान मिळणार आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कडून अर्ज मागविण्यात आले असून, त्याशिवाय हळदीवरील प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खर्चापोटी ४० टक्के अनुदानही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Share your comments