रब्बी हंगामात हरभरा हेच मुख्य पीक राहणार आहे. त्यामुळे शासनाकडून अनुदान तत्वावर देण्यात येणाऱ्या बियाणांमध्ये काही गैर नसू नये, याकरिता सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. आता कृषी आयुक्त कार्यालयाकडून एक नवाच नियम जारी करण्यात आलेला आहे.
येथून पुढे 10 वर्षाखालील हरभऱ्याच्या बियाणाला अनुदान दिले जाणार नाही. तर हेच अनुदान नव्या वाणाच्या बियाणांना देण्यात येणार आहे. कारण काळाच्या ओघात बियाणांमध्ये खराबी झाल्यास उगवण क्षमतांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रब्बीसाठी शेतकऱ्यांना नवे बियाणे मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियनांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणांचे वाटप केले जाते. आता रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांनी निर्णय घेतला असून 10 वर्षाच्या अगोदरचे बियाणांचे वाटप करता येणार नाही. तर नव्याने तयार करण्यात आलेले बियाणेच तेही त्याच अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासंबंधीच्या सुचना जिल्हा कृषी अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
नव्या निर्णयाचा काय होणार फायदा
हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. आतापर्यंत 10 वर्षापूर्वीचेही बियाणे अनुदानावर शेतकऱ्यांना वाटप केले जात होते. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची लागवड दुप्पट होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुन्या बियाणांची उगवणच झाली नाही तर अधिकचा धोका होणार आहे. त्यामुळे 10 वर्षापूर्वीचे बियाणांचे वाटप करु नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
कसे होणार अनुदानित बियाणांचे वाटप?
महाडिबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी बियाणांसाठी नोंदी केलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्याची निवड ही बियाणासाठी करण्यात आलेली आहे त्याचे नाव, बियाणे किती मिळणार यासंदर्भातली यादीच गावातील ग्रामपंचायत कार्यालय तसेच मुख्य चौकात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय वेळेत बियाणे हे शेतकऱ्यांना मिळेल याबाबत कृषी अधिकारी यांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार ‘ही’ बियाणे
हरभरा बियाणांची उगवण क्षमता चांगला असावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले आहेत. यामध्ये पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, बीडीएनजीके अशा वाणांचा समावेश राहणार आहे. या रब्बी हंगामात किमान 1 लाख 97 हजार क्विंटल बियाणाचे वाटप केले जाणार आहे. यामधील काही बियाणे हे पीक प्रात्याक्षिकसाठी ठेवण्यात येणार असून उर्वरीत बियाणे हे 2500 रुपये अनुदावर दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी बियाणाचा लाभ घ्यायचा कसा?
अनुदानावर बियाणे घ्यावयाचे झाल्यास त्या शेतकऱ्याने महाडिबीटी द्वारे यापूर्वीच नोंद करणे आवश्यक आहे. ही प्रक्रीया महिन्याभरापूर्वीच पार पडलेली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे शेतकऱ्यांची सोडत ही तालुका कृषी कार्यालयात काढली जाणार आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांचे नाव आले तर बियाणे खरेदीचा परवाना हा तालुका कृषी कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. परवान्यावर नोंद असलेल्या दुकानी जाऊन अनुदानाची रक्कम वगळून शेतकऱ्याला हरभऱ्याचे बियाणे हे मिळणार आहे. मात्र, बियाणे घेताना शेतकऱ्याकडे सातबारा, 8 अ, आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
Share your comments