Divisional Commissioner Shweta Singhal News
अमरावती : लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित अर्जदारांना कळविणे प्रशासनाचे काम आहे. यानुषंगाने सर्व प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय चौकशी करुन सुस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागांना आज येथे दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण २१ प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. अपर आयुक्त अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या ७ स्वीकृत अर्ज (प्रलंबित प्रकरणे) व १४ अस्वीकृत अर्ज (सामान्य तक्रार अर्ज) अशा एकूण २१ अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली.
लोकशाही दिनासाठी विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. लोकशाही दिनासाठी दाखल केलेल्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
Share your comments