मुंबई: अवैधरित्या होणाऱ्या एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्याचा मासेमारी नियमन कायदा सुधारित करण्यात यावा. अशा पद्धतीने मासेमारी करणारे जहाज जप्त करण्याची तरतूद करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे दिले.
एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने श्री. कदम यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त युवराज चौगुले आदी उपस्थित होते.
पारंपरिक मच्छिमारांचे हित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे असे सांगून श्री. कदम म्हणाले, एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणारी मासेमारी मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. त्यामुळे यास प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात यावीत. यावेळी श्री. जानकर म्हणाले, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी पाहता आचारसंहितेपूर्वी अधिसूचना काढण्याचा पर्याय अवलंबण्यात यावा.
Share your comments