नाशिक : राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे.
मंगळवारी दुपारी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नाशिक दौऱ्यावर येणार होते. त्यांचा दौरा जवळपास तीन तास उशिरा झाला. नाशिक जिल्ह्यातील काही गावांना अब्दुल सत्तार भेट देणार होते. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार होते. त्यामध्ये ठोस भरपाईचे आश्वासन मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र, अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यात असं काही घडलं की त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अब्दुल सत्तार यांचा तब्बल तीन तासाहून अधिक वेळ दौरा उशिरा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला होता. त्यात निफाड तालुक्यातील एकाच गावाला भेट दिल्याने शेतकरी चांगलेच संतापले होते.
कृषीमंत्र्यांकडे शेतकऱ्याची अजब मागणी
कृषीमंत्री महोदय आम्हाला आता द्राक्षाची शेती परवडत नाही आम्हाला गांजाची शेती करण्याची परवानगी द्या अशीही काही शेतकऱ्यांनी संतप्त होत मागणी केली आहे. त्यात आम्हाला भरपाई कधी मिळणार असा सवाल करत असतांना अब्दुल सत्तार यांनी ठोस आश्वासन न दिल्याने शेतकरी चांगलेच भडकले होते.
सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते, पंचनामा झाला त्याला चार महीने उलटून गेले तुम्ही अजून मदत केली नाही असा कोंडीत पाडणारा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारताच कृषीमंत्री यांची अडचण झाली होती. त्यावर माहिती घेऊन मदत केली जाईल असे म्हंटलं.
मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेऊ म्हणत अब्दुल सत्तार यांनी निफाडमधून काढता पाय घेतला. त्यामुळे सत्तार यांचा दौरा नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आऊन उलट सुलट चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच न मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.
Share your comments