दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आज रस्त्यावर उतरले आहेत. दुधाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. अकोले, अहमदमगर येथे दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला. तर दुध संकलन वाढवावे यासाठी भाजपकडून शासनाला निवेदन देण्यात आले.
दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला भाव द्यावा, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर १० रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशाप्रकारे आंदोलन करण्यात आले. यासह विवीध मागण्यांसाठी शिवसंग्राम, भाजप आणि महायुतीचे घटकपक्ष यांच्या माध्यमातून राज्यभर आज केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. जर या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाहीतर 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही मंगळवारी दूध बंद आंदोलन पुकारले आहे. कोरोना काळात दुधाचा खाजगी खप कमी झाला आहे, त्यातच सहकारी दुग्ध संघ दुधाची कमी खरेदी करत आहे. मंत्र्यांच्या डेअरीचे दूध प्राधान्याने खरेदी केले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडचे दूध विक्रीविना राहत असून शेतकऱ्यांना नुकसान होत आहे, असे भाजपने म्हटले आहे. गायीच्या दुधाला 10 रुपये तर भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, तर 30 रुपये लिटर दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी व्हावी यासाठी भाजपने निवेदन दिले.
शासनाने ऐकले नाही तर 1 ऑगस्ट रोजी राज्य व्यापी दूध संकलन बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील उपविभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला. यावेळी डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे हे उपस्थित होते.
Share your comments