मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शेतकऱ्यांची साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मोहीम कोरोना संकटकाळात सुरु आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत २९.५० लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला मिळणाऱ्या भावाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी ‘विकेल तेच पिकेल’ ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेत कुठल्या पिकाला कुठल्या भागात बाजारपेठ उपलब्ध राहणार आहे. तसेच बाजारात कुठल्या दर्जाचे पीक अपेक्षित आहे, याचा अभ्यास कृषी विभागाकडून करण्यात येईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा हमखास भाव मिळू शकणार आहे. यासह शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल जास्त काळ टिकविण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करण्यात येणार असून त्यामुळे मागणी असणाऱ्या बाजारात शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
कोरोना काळात राज्यातील विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. कुपोषित बालकांना आणि गरोदर आणि स्तनदा मातांना एका वर्षाकरिता मोफत दूध भुकटी देण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांसाठी १०० टक्के खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे. शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली असून आतापर्यंत पावणे दोन कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे.तसेच विद्यार्थ्यांसाठी शक्य त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना ७०० कोटींची मदत देण्यात आली आहे. पूर्व विदर्भात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातील बाधितांसाठी तातडीची मदत म्हणून १८ कोटी देण्यात आले आहेत.
Share your comments