राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभी असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.
तसेच संसदेच्या येणाऱ्या आगामी अधिवेशनात महा विकास आघाडीचे खासदार त्यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशा आशयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांवर चर्चेसाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरू आहे,त्याला गती देण्यात येईल.शेतकऱ्यांना देण्यात येणारी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत आणि अनुदान बँकांनी कोणत्याही प्रकारे रोखू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात येतील.
तसेच यावेळी खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना फसवणारे विमा कंपन्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे निर्देश देखील अजित पवार यांनी दिले.
तसेच महापुरामुळे नदीकाठच्या खरवडलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह सीएसआर फंडातून मदत करण्यात येईल, कर्जमाफीसपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Share your comments