मुंबई: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरु असल्याची माहिती, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत घरबांधणी, वृद्धाश्रम, शैक्षणिक योजनेसाठी निधी देण्यात येतो. राज्यातील अंदाजे 8 लाख ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांपैकी 18 ते 50 वयोगटातील 7 लाख 20 हजार कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रिमियम रुपये 165/- प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लाख रुपये खर्च अपेक्षित असून 51 ते 59 वयोगटातील 80 हजार कामगार व कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा प्रिमियम 6 रुपये प्रमाणे एकूण 4 लाख 80 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच अंत्यविधी अर्थसहाय्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी योजनेकरिता वित्त विभागाने प्रथम टप्प्यामध्ये योजनेसाठी रु. 20 कोटी एवढा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
उपरोक्त विषयावर सदस्य विनायक मेटे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
Share your comments