मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळात एसटी महामंडळाचे कर्मचारी संप करण्याची माहिती दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती आणि विविध मागण्यांवरुन ११ सप्टेंबरला संपाची हाक दिलीय. मुंबईतील आझाद मैदानावर हा बेमुदत संप करण्यात येणार आहे.
तसंच जर सरकारने १३ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यातील आगारातील कर्मचारी काम बंद करुन उपोषणाला बसणार आहेत, असा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीत ४२ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत मिळावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या ५ हजार, ४ हजार आणि २ हजार ५०० मुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या १९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होतं आहे. त्यापूर्वीच ११ सप्टेंबरला एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
दरम्यान, मागील वर्षी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी सणासुदीच्या काळात संप पुकारला होता. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले होते. मात्र तेव्हा देण्यात आलेली काही आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नसल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
Share your comments